कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास ८१ टक्के पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास सहमती दर्शविली आहे. राज्यातील तब्बल ५ लाख २५ हजार ८८ पालकांनी यासाठी होकार दिल आहे, तर राज्यातील १ लाख २० हजार ५९४ पालक अजून सुरक्षिततेच्या कारणास्तव मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. एससीईआरटीमार्फत झालेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे.
कल नोंदविलेल्या राज्यातील एकूण पालकांपैकी जवळपास १८ टक्के पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे सांगत आहेत. एससीईआरटीची ही आकडेवारी १२ जुलै २०२१ रोजी रात्री ९ वाजेपर्यंतची असून, हे सर्वेक्षण रात्री ११.५५ पर्यंत सुरू होते.
कोरोनामुक्त भागामध्ये शाळा सुरू कराव्यात का, या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) एक राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील पालक आणि शिक्षकांची शाळा सुरू करण्याबाबत मते नोंदवली गेली. या सर्वेक्षणात सोमवारी रात्री ९पर्यंत एकूण ६ लाख ४५ हजार ६८२ पालकांनी मते नोंदविली. ग्रामीण भागातील २ लाख ८७ हजार ५७८, तर शहरी भागातील २ लाख ९० हजार ८१६ पालकांनी यात सहभाग घेतला. निम शहरी भागातील पालकांची संख्या ६७ हजार २८८ होती. ग्रामीण भागातील पालकांचा सहभाग ४४.५४ टक्के, तर शहरी भागातील पालकांचा ४५.०४ टक्के इतका सहभाग होता.
ग्रामीण भागात पालकांना इंटरनेट कनेक्शन, स्मार्टफोनसारखी संसाधने अशा सुविधा परवडत नसल्याने त्यांचा कल प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याकडे अधिक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत. आता या सर्वेक्षणावरून आणि पालकांचा कल जाणून घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?विद्यार्थ्यांसह शाळा सुरू कराव्यात अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी प्रत्यक्ष अध्यापन झाल्यास विद्यार्थ्यांसाठी ते खूप आश्वासक असेल असे अनुभवातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करणेही आवश्यक आहे.
त्यातील अनेकांनी सुरक्षित, असुरक्षित वातावरणात कोविडसंदर्भातील, निवडणुकांसंदर्भातील कामे केली आहेत. पुन्हा शालेय काम सुरू करण्याआधी आणि शाळा सुरू करण्याआधी विद्यार्थी आणि शिक्षक यांना योग्य साहाय्य, पाठिंबा आणि समुपदेशनाची गरज आहे.