बंगळुरू : भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स या विषयात तज्ज्ञ असलेल्या अक्षय माशेलकर यांनी चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा रोबोट बनविला आहे. त्याला ‘शिक्षा’ असे नाव देण्यात आले आहे. रोबोट तयार करण्यासाठी अक्षयने कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील सिरसी येथे सखोल संशोधन केले.
शिक्षा रोबोट बनवून तयार असला तरी कोणत्याही संस्थेत किंवा शाळेत तो अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. अक्षय माशेलकर यांनी बी. एड.चा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात शाळा बंद होत्या. त्यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्यासाठी संगणक, मोबाइल फोनचा वापर करण्यात येत होता. मात्र, ऑनलाइन शिक्षणाची पद्धत ही कंटाळवाणी आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून मला शिक्षा या रोबोटची कल्पना सुचली. शिक्षण हे परस्परसंवादी असावे. तशी साधने विकसित केली तर वर्गातील चैतन्यदायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिकता येते. चौथी इयत्तेपर्यंतचे विद्यार्थी उत्तम प्रकारे शिकू शकतील, अशी शिक्षा रोबोटची रचना करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
अचूक उत्तर देणाऱ्याला देतो शाबासकीशिक्षा हा रोबोट बनविण्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान वापरलेले नाही. भारतातील ग्रामीण भागातील शाळा, विद्यार्थी यांना परवडेल, अशा किमतीचा रोबोट बनविण्याचे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले होते. शिक्षा हा चालता फिरता रोबोट आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नाची अचूक उत्तरे दिली तर तो आनंदाने मान हलवतो.
शिक्षणपद्धतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हवासिरसी येथील चैतन्य महाविद्यालयात अक्षय माशेलकर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, वर्गात शिकताना मुलांना तंत्रज्ञानाची मोठी उणीव जाणवते. शिक्षणपद्धतीत प्रगत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने माझ्या मनात काही संकल्पना आहेत.