- सीमा महांगडे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा तेथे केंद्र’ या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत बारावीत तोतया विद्यार्थी बसविण्याचे प्रकार घडले. काही परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेची पाने फाडल्याचाही प्रताप केला. मुंबई विभागातील दहावी-बारावीच्या २३ गैरमार्गांच्या प्रकरणांची चौकशी होणार आहे.
मुंबई विभागीय मंडळात बारावीची एकूण १८, तर दहावीची ५ गैरप्रकरणे आढळल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. कॉपीची प्रकरणे घडू नयेत यासाठी विभागीय मंडळाने परीरक्षक, भरारी पथके, विशेष बैठी पथके नेमली होती. बारावीच्या विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्राच्या पेपरला वैयक्तिक कॉपीची ४ प्रकरणे आढळली. यातील साहित्य अद्याप मंडळाकडून जमा केले गेलेले नाही. त्यानंतर वाणिज्य शाखेच्या ‘ओसी’ विषयाच्या पेपरला मुंबई विभागात ४ गैरमार्ग प्रकरणे आढळली आहेत. यात तोतया विद्यार्थी परीक्षेस बसल्याचे समोर आले आहे. दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरला २ गैरमार्ग प्रकरणे आढळून आली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे शेवटचे पान फाडण्यात आल्याचे आढळले.
विभागीय समितीकडून चौकशीमुंबई विभागीय मंडळाकडून लवकरच एक विभागीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गैरमार्ग प्रकरणे कॉपी करताना पकडले (पुस्तक, गाईडची छायांकित पृष्ठे, हस्तिलिखित पाने जप्त) मोबाईलमधून कॉपी तोतया विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट उत्तरपत्रिकेची पाने फाडली