लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचे योग्यरितीने पालन करण्यात यावे. अन्यथा शाळांवर कारवाईचा इशारा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे.
सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवावे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सर्व शाळांनी वेळांमध्ये बदल कऱण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाचे योग्य रितीने पालन व्हावे. तसे न झाल्यास कारवाई कऱण्यात येईल, असे मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले आहे.
जागेची चणचण, पालक-शिक्षकांचा विरोध अशा अनेक अडचणींमुळे मुंबई-ठाण्यातील अनेक शाळांचा चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविण्याला विरोध आहे. संपूर्ण शाळाच दोन शिफ्टमध्ये भरविल्या जातात. तर काही शाळांमधील प्राथमिकच्या शिक्षकांना उशीराची वेळ मान्य नाही. तर काही शाळांकडे प्राथमिकचे वर्ग एकाचवेळी भरविता येतील इतक्या पायाभूत सुविधा नाहीत.