मुंबई - लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी केंद्र दत्तक देवून त्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. MOU अंतर्गत ५० अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या असून यामुळे अंगणवाड्यांचे बळकटीकरण होण्यास मदत होईल असं मत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या करारानुसार पुढील १० वर्षांसाठी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, युनायटेड वें मुंबई कर्जत मधील वीस अंगणवाड्या, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळा मधील तीन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.
यामुळे दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर देणगी, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समिती द्वारे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी 9082269044 या नंबर वर संपर्क साधावा असंही मंत्री लोढा यांनी आवाहन केले. त्याचसोबत राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुपोषित ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सक्षम राज्य निर्मिती होण्याकरिता अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही शासनाची अतिशय नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावूया व महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया असं लोढा यांनी सांगितले.
दरम्यान, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.