पूनम अपराज/सीमा महांगडे
मुंबई - परळ येथील नामांकित शिरोडकर हायस्कुल. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचं हे हायस्कुल असून येथे मराठी माध्यम आणि सीबीएससी बोर्डचे वर्ग या शाळेत भरतात. या शाळेत अनेक विद्यार्थी घडले आणि घडत आहेत. मात्र, या शाळेत सीबीएससी बोर्डाचे ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे ज्या ठिकाणी वर्ग भरतात. त्या वर्गांच्या बाजूला असलेल्या एका स्टोअर रूमसारख्या असलेल्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कमर्शियल सिलेंडर ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला असल्याचे आढळुन आले आहे. याबाबत शाळेच्या प्रशासनाला विचारल्यानंतर अशा प्रकारे काहीच नसल्याचा दावा त्यांनी केला. नंतर लोकमतच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी नेऊन दाखविले. त्यानंतर प्रशासनाने हात वर करत याबाबत शाळेचे ट्रस्टी यांना याबाबत विचारण्यास सांगितले. त्यानंतर, लोकमतने ट्रस्टी आणि सचिव श्रीकृष्ण हंजनकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
हे कमर्शियल सिलेंडर ज्या ठिकाणी ठेवण्यात आले. त्या ठिकाणाचे लोकमतने एप्रिल महिन्यात चित्रीकरण केले. त्यांनतर आज याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी यांना गाठले. प्रशासकीय अधिकारी अर्चना कांबळी यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाकडून आम्हाला दुसरेच फोटो दाखवून कारवाई करण्यास सांगितले होते. आमच्या शाळेच्या परिसरात असा प्रकारे कुठेच सिलेंडर नसून आमचे शाळेकडे दीप फायर सेफ्टी सर्व्हिसेसचे फायर ऑडिट केले असून शाळा फायर सेफ असल्याचे प्रमाणपत्र आमच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या कँटीनमागे असलेल्या मोकळ्या जागेत लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, लाकडी बेंच आणि त्यात एकाहून अधिक सिलेंडर आढळुन आले आहेत आणि ते आम्ही शाळेच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या कांबळे यांना नेऊन दाखविले. यावर त्यांनी शाळेच्या ट्रस्टीला याबाबत विचारा असे सांगितले.
तसेच शाळेच्या एका पालकाने नाव नमूद न करण्याच्या अटीवर त्यांची मुलगी सीबीएससी बोर्डाच्या सातवी इयत्तेत शिकत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ असून यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि शाळेच्या आवारातून सिलेंडर हटवले पाहिजे. ज्या ठिकाणी सिलेंडर आहेत. त्याच्या शेजारीच चिमुकल्या विद्यार्थ्यांचे ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग भरतात. त्याचप्रमाणे याच इमारतीत संपूर्ण सीबीएससी बोर्डाची शाळा भरते आणि त्याच इमारतीत सर्व विद्यार्थी बसतात. त्यामुळे शाळा प्रशासनाला गुजरातसारखी आगीची घटना घडल्यावरच जाग येणार आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली.
शाळांमध्ये एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरपूर्व प्राथमिकपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने शाळांची सुरक्षा त्यांचं दृष्टीने अतिमहत्त्वाची ठरत असते. त्यामुळे स्फोटक द्रव्यांचा साठा न करणे, अग्निशमन व अग्निरोधक यंत्रणाची सुविधा असणे, तत्काळ बाहेर पडण्यासाठी आवश्यक त्या सुविधा करून घेणे हे सारे नियम शाळांनी पाळणे आवश्यक आहे. मात्र, परेलच्या शिरोडकर हायस्कुलने मात्र सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवीत एकाहून अधिक गॅस सिलिंडरचा साठा केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणी खुलासा विचारला असता उडवाउडवीची उत्तरेही देण्यात आली.गॅस सिलिंडर भरलेले असोत किंवा मोकळे ते स्फोटक द्रव्याचे वाहक असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे एकाहून अधिक गॅस सिलिंडचा साठा शाळेमध्ये केला जाऊ शकत नसल्याची माहिती एक ते २ शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.शिक्षण विभागाकडूनही टोलवाटोलवीयासंदर्भातील नियमावलीची अधिक माहिती घेण्यासाठी मुंबई विभागाचे उपसंचालक आणि दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यभार असलेल्या राजेंद्र अहिरे याना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो टाळला. इतकेच नाही तर उपसंचालक कार्यालयातील त्यांच्या नंतर कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आमचं अखत्यारीत येत नसल्याचे सांगत त्यांनी हि टोलवाटोलवी केली. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे शाळा आणि शिक्षण विभागच कानाडोळा करत असेल तर याची जबाबदारी घेणार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.