मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमावरून राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांसारख्या इतर मंडळांच्या विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे. सीईटीच्या परीक्षा पद्धतीच्या फरकामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे तर पडणार नाहीत ना, अशी भीती आता पालकांसह मुख्याध्यापकांकडूनही व्यक्त होत आहे.
शिक्षण मंडळाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंचाची तयारी करावी किंवा त्यांना अभ्यासक्रम, प्रश्नांचा आराखडा समजावून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे. राज्य मंडळाच्या बोर्डाचा दहावीचा अभ्यासक्रम हा इतर बोर्डांच्या तुलनेत दोन वर्षे मागे आहे. त्यामुळे तो अभ्यासणे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड नाही. उलट आतापर्यंत दहावीसाठी दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी केलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना आता बहुपर्यायी उत्तरांची तयारी करणे अवघड जात असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली. विद्यार्थी, पालक शिक्षकांकडे आणि मुख्याध्यापकांकडे तयारी कशी करावी? प्रश्न कसे असतील, काठिण्यपातळी कशी असेल, अशा प्रश्नांची विचारणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एससीईआरटी व शिक्षण मंडळाने यावर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला कमी गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाच्या स्पर्धेत आपण मागे पडू, अशी भीती वाटत असताना दुसरीकडे इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही आपला दहावीचा अभ्यासक्रम वेगळा असताना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी कशी देणार? असा प्रश्न पडला आहे. सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ठेवणे, हा भेदभाव आहे. यासंदर्भात इतर मंडळांसाठी राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी का, अशी विचारणा करणारी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आधी कोरोना व आता पूरपरिस्थिती यामुळे सीईटी परीक्षेच्या नियोजनात काही अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या परीक्षेबाबत स्पष्टता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बारावीच्या निकालाचीही तारीख ठरेनाबारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून, राज्य शिक्षण मंडळ स्तरावर त्यावर काम सुरू असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. मात्र, निकाल जाहीर होण्याची निश्चित तारीख सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकाल वेळेत लागावा यासाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीईटीचे वेळापत्रक कधी येणार?राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. बारावीचा निकालही येत्या काही दिवसांत जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने परीक्षांच्या तारखा आणि वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.सीईटी सेलकडून बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे. मात्र, अद्याप त्या परीक्षांच्या वेळापत्रका-बाबत माहिती देण्यात न आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी आणि इतर विद्या शाखांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. यंदा एकूण ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जुलै संपत आला तरी अद्याप परीक्षांचे वेळापत्रक नसल्याने विद्यार्थी, पालकांना सीईटी परीक्षा आणखी लांबणार का, अशी भीती वाटू लागली आहे. परीक्षा लांबल्यास पुढील प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होऊन शैक्षणिक वर्ष लांबण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि त्यासंदर्भातील सूचना लक्षात घेता सीईटी परीक्षा लवकर होऊन प्रवेशाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी इच्छा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.