प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता अनेकांनी करिअरच्या दिशा ठरविण्याचे निश्चित केले आहे. आजूबाजूला करिअरच्या संधी पाहून यंदा शाखा निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. यंदा आयटी आणि अकाैंट फायनान्समध्ये असलेल्या संधी पाहूनच वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडे विद्यार्थी वळत असल्याचे निरीक्षण महाविद्यालयांनी नोंदविले.
दहावी, बारावीनंतर पुढे काय ? असा प्रश्न निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पडतो. याविषयी आपल्या पालकांशी, मार्गदर्शकांशी चर्चा करून करिअरची दिशा ठरवली जाते. यंदा मात्र विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधी पाहूनच शाखा निवडण्याचे निश्चित केल्याचे प्राचार्यांनी सांगितले. यंदा आयटी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड कल दिसत आहे. त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन काॅम्प्युटर सायन्स निवडण्याकडे मुलांचा कल आहे. बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, सीए या करिअरचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ज्यांना या करिअरमध्ये रस आहे, ते वाणिज्य शाखेची निवड करत आहेत. गेल्यावर्षी सेल्फ फायनान्सकडे विद्यार्थ्यांचा कल होता. ज्यांना युपीएससी आणि सायकॉलॉजीमध्ये रस आहे, ते कला शाखेकडे वळतात, अशी माहिती जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी दिली.
- बीएमएस, अकाैंटिंग अँड फायनान्स, सीएस, आयटी हे अभ्यासक्रम विद्यार्थी वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडे वळत असल्याचे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी सांगितले.
- गेल्या वर्षी ज्यांना बांदोडकर महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळाला नाही, त्यांनी दुसरा अभ्यासक्रम निवडलाच नाही, अशी माहिती बांदोडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या क्षितिजा ढाकणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये आयटी क्षेत्राची क्रेझ
- कोरोनानंतर आयटी क्षेत्राची क्रेझ वाढू लागली आहे. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा याच क्षेत्राकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे अधिक प्रवेश घेत आहेत, असे प्राचार्य संतोष गावडे यांनी सांगितले.
- ज्या विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत, त्यातील अनेक विद्यार्थ्यांचे करिअर ठरलेलेे असते, ते विद्यार्थी आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात आणि ज्यांचे करिअर सेट आहे ते पाहूनच ते शाखा निवडतात, असेही निदर्शनास आल्याचे गावडे यांनी सांगितले.