मुंबई : कोरोना संकटामुळे शाळा टप्प्याटप्प्याने आणि संमिश्र (हायब्रीड मॉडेल) पद्धतीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पद्धतीने वर्ग भरवले तरी यापुढे हायब्रीड मॉडेल (संमिश्र शिक्षणपद्धती) वापरावे, असे मत ७१ टक्के विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात नोंदवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याबद्दल काय वाटते? पालकांची काय तयारी आहे? शाळांनी काय तयारी केली, यासंबंधात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे शाळा सुरू झाल्यावर सुमारे ८२ टक्के विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत, तर देशातील इतर राज्यांत अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी होणार आहेत. ब्रेनली या ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठ पुरविणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात विविध राज्य, जिल्ह्यातील पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपले मत नोंदवल.
या सर्वेक्षणातून ८२ टक्के विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाण्यास तयारी दर्शवली, तर १८ टक्के विद्यार्थी सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांमध्ये जाण्यास तयार नाहीत. शाळा सुरू झाल्यावरही पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षात होणाऱ्या वर्गात पाठवण्यास तयार आहेत का, या प्रश्नाला ६० टक्के विद्यार्थ्यांनी होकार दर्शविला. तर १९ टक्के पालक अद्यापही तयार नसल्याचे समोर आले आहे. १९ टक्के पालक अजूनही द्विधा मन:स्थितीत असल्याने प्रश्नाचे उत्तर देऊ शकलेले नाहीत, असे संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे.
- महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्या तरी मुलांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली नाही. मात्र इतर काही राज्यांत काही शाळांनी ती बंधनकारक केलेली आहे. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक केल्याचे, तर ४४% विद्यार्थ्यांना ती बंधनकारक नसल्याचे समोर आले आहे.
- प्रत्यक्षातील वर्ग सुरू करताना किंवा झालेले असताना शाळा आरोग्य सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन व सुविधा पुरवत आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना ७८ टक्के विद्यार्थ्यांनी होकार दिला. तर २१ टक्के विद्यार्थ्यांनी सुविधांचा अभाव असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळेच अनेक पालक मुलांना शाळांमध्ये पाठविण्यास अद्यापही तयार नसल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नोंदवले आहे.
- सद्यस्थितीत सर्वेक्षणातील ८२ टक्के मुले अद्यापही ऑनलाईन शिक्षण घेत असून पुढेही प्रत्यक्ष वर्ग भरले तरी ते ऑनलाईन शिक्षण घेणार असल्याचे मत ७३ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे.
विद्यार्थी, पालकांनी काहीअंशी गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ ऑनलाईन शिक्षणपद्धतीशी जुळवून घेतले. मात्र प्रत्यक्ष वर्गांची ओढ आणि आवश्यकता जास्त असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. शाळेतील संवाद, शिक्षण, मैत्री, शारीरिक व बौद्धिक वाढ यांचे शाळेत मिळणारे प्रत्यक्षातील शिक्षण कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. मात्र ऑनलाईन शिक्षणाकडून प्रत्यक्ष शिक्षणाची वाटचाल ही सुरक्षितता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने करायला हवी. राजेश बिसणी, सीपीओ, ब्रेनली