नितिन पंडीत -
भिवंडी - कोरोना काळात गेले दीड वर्ष सर्व जनजीवन विस्कळीत झाले असताना विद्यार्थ्यांच्या शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षणाची सुरवात करण्यात आली. या ऑनलाइन शिक्षणाला शहरी भागांत काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी ग्रामीण भागासह शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात राहणारे लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच आहेत. यामुळे भिवंडी पालिका शिक्षण मंडळातील शिक्षक इकबाल अन्सारी यांनी चक्क मोहल्ल्यात एका भिंतीवर शालेय अभ्यासाचे चार्ट लावून शिक्षणाची भिंत उभारली आहे.
आसबीबी परिसरातील उर्दू माध्यमाची शाळा क्रमांक ६२ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीमध्ये ८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु घरची गरिबी, मोलमजुरी करणारे पालक यामुळे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तब्बल ५० टक्क्यांहून अधिक विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यातच झोपडपट्टी परिसर असल्याने शाळा व अभ्यास नसल्याने उनाड झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी रहावी, खेळत बागडत त्यांचा अभ्यास सुरू रहावा, त्यामध्ये खंड पडू नये, यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे.
यासाठी शालेय अभ्यासाचे काही चार्ट, पाढे, मुळाक्षरे यांचे बोर्ड बनवून ते परिसरातील एका भिंतीला लावण्यात आले आहेत. ज्यामुळे परिसरातील मुले खेळण्यासाठी त्या ठिकाणी आली तरी त्यांचा अभ्यास सुरू असतो.
शाळेची मुजोरी! पालकानं फी कमी करण्याची केली मागणी, शाळेनं थेट मुलाचा दाखलाच पाठवला घरी
लॉक डाऊन काळात गरजवंतांसाठी कपडे व इतर साहित्य उपलब्ध करून गरिबांना वाटप करण्यासाठी "नेकीं की दिवार" वंजारपट्टी भागात बनविण्यात आली होती. त्याठिकाणी अनेकांनी मदत केली होती. त्या संकल्पनेतूनच मी ही शिक्षणाची भिंत उभी केली असल्याची भावना शिक्षक इकबाल अन्सारी यांनी व्यक्त केली .
विशेष म्हणजे अपंग असलेले इकबाल अन्सारी सरांनी पहिल्या लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांना पोस्टकार्डावर अभ्यास व त्यावरील प्रश्न बनवून पाठविले होते , त्याची उत्तरे विद्यार्थांनीसुद्धा पोस्टकार्डावर लिहून पाठविली होती. त्यानंतर त्यांनी ही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी कायम राहावी, ते शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी ही शिक्षणाची भिंत उभी केली असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्त मोठमोठे होर्डिंग लावले जातात, परंतु शहरातील अनेक गरीब झोपडपट्टी भागांत सध्या ऑनलाईन शिक्षण न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्यास शाळाबाह्य होणारी विद्यार्थी संख्या रोखण्यात सर्वानाच यश मिळेल, अशी प्रतिक्रिया इकबाल अन्सारी यांनी शेवटी दिली आहे.
मुंबईकर पालक म्हणतात, आता ऑनलाइन शाळा नको!
आमच्या शाळा बंद असल्याने आमचे शिक्षणही बंद पडले होते. घरात मोबाईल फक्त फोन करण्या पुरता असून त्यामुळे आम्ही सध्या शिकवणी वर्गात जात असून इकबाल सरांनी शिक्षणाची भिंत उभी केल्याने या भागात आम्ही खेळत असताना मैत्रिणींसह अभ्यासही करू शकतो, अशी प्रतिक्रिया ईकरा अन्सारी या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
एकंदरीतच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या शिक्षणात खंड पडूनये म्हणून मनपा शाळेतील शिक्षक इकबाल अंसारी यांनी सुरु केलेल्या शिक्षणाची भिंत या मोहिमेला आता शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिक्षक इकबाल अंसारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्या येत आहे.