लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांची वर्तणूक आणि कृत्ये नैतिकतेला धरून तसेच कायम प्रेरणा देणारी असावीत. त्यांनी त्यांची कर्तव्ये अत्यंत सचोटीने पार पाडणे अपेक्षित असते. कामाच्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित कपडे घालून जावे. तसेच विद्यार्थ्यांनीही वैद्यकीय शिक्षण घेताना कुठलेही व्यसन करू नये, अशी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दोनच दिवसांपूर्वी जाहीर केली आहेत.
आयोगाच्या एथिक्स ॲण्ड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्डाने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिल्या आहेत. त्यात शिक्षकांसाठी शिकवण्याची प्रक्रिया, परीक्षा मूल्यांकन प्रक्रिया, शिक्षक - विद्यार्थी संवाद, शिक्षकांची भूमिका अशा दैनंदिन आयुष्यातील मुद्द्यांचा या सूचनांमध्ये समावेश आहे.
शिक्षकांना काही सूचना करताना सांगितले आहे की, जो विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असेल अशा विद्यार्थ्यांना हुडकून त्यांच्याशी संवाद साधावा आणि शिक्षणाच्या अनुषंगाने असणाऱ्या त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. शिक्षकाने विद्यार्थ्याशी संवाद साधताना निष्पक्ष असणे आवश्यक आहे. प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा, सामाजिक, आर्थिक वर्ग किंवा इतर कोणत्याही घटकांच्या आधारावर त्यांनी भेदभाव करू नये. प्रश्नपत्रिका गोपनीय राहील हे शिक्षकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे आणि सर्वांगीण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. ते शिक्षण केवळ परीक्षा केंद्रित अजिबात असू नये.
विद्यार्थ्यांनी नियमित हजेरी लावावी!
विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थांनी वर्गात नियमित हजेरी लावली पाहिजे, वैद्यकीय शिक्षण केवळ पुस्तकातून प्राप्त होत नसून शिक्षकांच्या प्रदीर्घ अनुभव आणि प्रात्यक्षिकांतून प्राप्त होते हे विद्यार्थांनी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी निरोगी आयुष्य जगले पाहिजे तसेच सर्व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. जे व्यसन करीत असतील त्यांनी त्यापासून दूर राहण्यासाठी उपचार आणि समुपदेशन करून घेतले पाहिजे. रुग्णांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषा शिकून घेतली पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती उद्भविल्यास आरोग्यसेवेसाठी विद्यार्थ्यांनी मदत केली पाहिजे, अशा सूचनांचा समावेश आहे.