मुंबई : सध्या राज्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाहीचा पहिला टप्पा सुरू असून, त्याची मुदत २० जून रोजी संपली. याअंतर्गत शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक होते. मात्र, प्रणालीमध्ये अजूनही बऱ्याच शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट केले नसल्याची माहिती शासनाला मिळाली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडून या कार्यवाहीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता शिक्षकांना येत्या २७ जूनपर्यंत आपल्या प्रोफाइलमध्ये आवश्यक बदल करण्यास वेळ मिळणार आहे.
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या यावर्षी ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली आहे. दरम्यान, शिक्षकांना स्वतःची ऑनलाइन प्रोफाइल तयार करून ती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. राज्यभरातील बदलीस पात्र शिक्षकांनी आपल्या प्रोफाइल तयार करून त्या अद्ययावत केल्या असल्या तरी काही त्रुटींमुळे प्रोफाइलमध्ये काही बदल राहिले आहेत. शिक्षकांना त्या त्रुटी दूर करण्यासाठी २० जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्यातही ही कार्यवाही पूर्ण न झाल्याने या मुदतीत वाढ करून २७ जूनपर्यंत शिक्षकांना मुदतवाढ दिली आहे. बदलीच्या अनुषंगाने त्रुटी असलेल्या शिक्षकांच्या प्रोफाइल अपडेट करणे बाकी असल्याने बदल्यांना शिक्षण विभागाने एक आठवड्याची मुदतवाढ दिली.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक शिक्षकांच्या बदल्या करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील निर्णय तत्काळ घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे उपसचिव वळवी यांनी राज्य समन्वयक, विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयकांच्या नियुक्तीच्या सूचना जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय अवघड क्षेत्राविषयीही काही सूचना निर्मित करण्यात आल्या आहेत. शिक्षक बदल्यांच्या कार्यवाहीचा पुढील टप्पा पार पडताना या सूचनांच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.