अजाणत्या वयात असलेल्या अल्पवयीन मुलांना आई-बाबाने केलेला स्पर्श (टच) आणि इतर व्यक्तीने वाईट उद्देशातून केलेला स्पर्श (टच) समजावून सांगण्यासाठी, त्यांना केवळ शाब्दिकच नव्हे; तर व्यावहारिक स्वरूपातदेखील शिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
अल्पवयीन मुलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा स्थितीत जर कोणी मुलांशी गैरवर्तन केले, कोणालाही सांगू नको, अशी धमकी दिली तर त्याला ‘बॅड’ टच म्हणतात, हे मुलांना समजावून सांगायला हवे. असा काही प्रकार घडल्यास आधी आपल्याला येऊन सांग, अशी समज त्यांना देण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे.
हे म्हणजे ‘गुड टच’
मुलांना समजावून सांगा की जर एखाद्या नात्यातीलच किंवा शेजारच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना प्रेमाने स्पर्श केला आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि निश्चिंत वाटले तर तो एक चांगला स्पर्श (गुड टच) आहे.
हे म्हणजे ‘बॅड टच’
एखाद्याने शरीराला स्पर्श केला आणि त्याचा त्रास झाला तर तो स्पर्श हा बॅड टच आहे, असे समजावे. खासगी अवयवांना चांगली व्यक्ती कधीच स्पर्श करीत नाही, त्याची माहिती मुलांना द्यायला हवी, ही काळाजी गरज आहे.
अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत समाजात सर्वच स्तरात जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. नात्यातीलच एखादी चुकीच्या विचारशैलीची व्यक्ती किंवा इतर कुणी मुलांना बॅड टच करीत असेल तर त्याकडे पालकांनी दुर्लक्ष न करता तत्काळ दखल घेतली पाहिजे. पोलिसांतही तक्रार करायला हवी. पोलीस कारवाई करण्यास सज्ज आहेत. - रफीक शेख, ठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन