नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. अर्थसंकल्पात मांडलेल्या अनेक घोषणांबाबत चर्चा केली जात आहे. शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना अर्थमंत्र्यांनी देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा केली असून, शिक्षणाशी संबंधित जुन्या योजनांमध्येही बदल केले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी देशात शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच हे डिजिटल विद्यापीठ 'हब अँड स्पोक मॉडेल'च्या आधारे उभारण्यात येणार असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
याचबरोबर, PM eVIDYA योजनेचा 'वन क्लास वन टीव्ही चॅनल' कार्यक्रम आता 12 वरून 200 टीव्ही चॅनेलवर वाढवला जाईल. या कार्यक्रमात अनेक भारतीय भाषांचा समावेश केला जाईल, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नुकसान झाले आहे, त्यांना शिक्षण देणे सोपे होईल.
नोकरीच्या संधी मिळतीलउद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कमध्ये सुधारणा केली जाईल, असेही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगण्यात आले आहे. यासोबतच डिजिटल इकोसिस्टम फॉर स्किलिंग अँड लाइव्हलीहूड नावाचे ई-पोर्टल देखील सुरू केले जात आहे, जेणेकरून लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.