केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सोमवारी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या परिक्षेत पहिले ३ क्रमांक मुलींनी पटकावले. तर उज्जैनच्या ऐश्वर्य वर्मा (Aishwarya Verma UPSC Topper) याने UPSC 2021 नागरी सेवा परीक्षेत AIR 4 (All India Rank) मिळवत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला. खरे तर त्याच्या नावामुळे, सुरुवातीला सर्वांनाच तो एक महिला उमेदवार वाटला. मात्र, नंतर तो पुरुष उमेदवार असून मध्य प्रदेशातील उज्जैनचा असल्याचे स्पष्ट झाले.
ऐश्वर्य म्हणतो 'सर्व बाबा महाकाल यांचे आशीर्वाद' -सध्या ऐश्वर्य आपल्या कुटुंबीयांसोबत उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहतो. बाबा महाकाल यांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये ऐश्वर्यचा जन्म झाला आहे. तो म्हणाला, परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन.
परीक्षेच्या तयारीसंदर्भात बोलताना ऐश्वर्य म्हणाला, रोज 16-16 तास अभ्यास करणे ही एक भ्रामक गोष्ट आहे. UPSC चा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, अशा स्थितीत लहान, मध्यावधी आणि दीर्घकालीन योजना करून संपूर्ण तयारी करायला हवी. याच बोरबोर त्याने सांगितले, की त्याला चेस आणि क्रिकेट खेळायला आवडते. तो आपल्या तयारीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी चेस आणि क्रिकेट खेळत असे. असे केल्याने अनावश्यक ताण कमी होतो.आई-वडील आणि मित्रांना दिलं यशाचं श्रेय -मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नीमच आणि कटनी येथून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या ऐश्वर्य वर्माने UPSC 2021 मध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मित्रांना दिले आहे. तो म्हणाला, 'माझ्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. ते प्रत्येक परीक्षा आणि मुलाखतीपूर्वी माझे मनोबल वाढवत होते.' ऐश्वर्यने 2017 मध्ये उत्तराखंडमधील पंत नगर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून बीईची पदवी मिळवली आहे.
करोनामुळे दिल्ली सोडावी लागली -ऐश्वर्य दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र, तेथे करोनाच्या उद्रेकामुळे त्याला दिल्ली सोडावी लागली. यानंतर त्याने बरेली आणि उज्जैनमध्ये येऊन तयारी केली.