UPSC CSE 2023 : काल, म्हणजेच 16 एप्रिल 2024 रोजी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत देशात दुसरा आलेल्या अनिमेश प्रधान(animesh pradhan) साठी कालचा दिवस खुप मोठा होता. ओडिशाचा रहिवासी असलेल्या अनिमेशने UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावून आपल्या दिवंगत आईचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे, अनिमेशने अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC AIR 2 मिळवला आहे. अनिमेशने या यशाचे सर्व श्रेय आपल्या आईला दिले आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईने काळजी घेतलीवयाच्या अवघ्या 22व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करुन IAS बनणाऱ्या अनिमेश प्रधानने तरुण वयात खूप काही पाहिले. वडील प्रभाकर प्रधान अंगुल जिल्ह्यातील महाविद्यालयात प्राचार्य होते. 7 वर्षांपूर्वी, म्हणजेच 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर अनिमेशच्या आईने त्याचा सांभाळ केला. अनिमेष सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता, त्याला बारावीत 98.08% गुण मिळाले होते.
12वीमध्ये चांगले गुण मिळवल्यानंतर अनिमेषला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) राउरकेलामध्ये प्रवेश मिळाला. येथून त्याने संगणकशास्त्रात बी.टेक. पूर्ण केले. एनआयटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करत असताना अनिमेषने 2022 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. तो रोज 6 ते 7 तास UPSC चा अभ्यास करायचा. एकीकडे त्याचा अभ्यास सुरू होता, तर दुसरीकडे त्याच्या आईला टर्मिनल कॅन्सरने ग्रासले.
यूपीएससीच्या मुलाखतीपूर्वीच आईचा मृत्यूअनिमेषने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षा पास केल्या. आता अनिमेश यशापासून फक्त एक पाऊल दूर होता. अनिमेशने माहित होते की, त्याची आई फार दिवस जगणार नाही. त्यामुळेच त्याला लवकरात लवकर UPSC परीक्षा पास करुन आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते. तो काळ त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. एकीकडे अभ्यास, दुसरीकडे आईचे आजारपण. अशातच त्याने यूपीएससीची मुलाखत दिली आणि ऑल इंडिया रँक-2 मिळवला. पण, मुलाखतीपूर्वीच त्याच्या आईचे टर्मिनल कॅन्सरमुळे निधान झाले. अनिमेषचे यश साजरा करण्यासाठी त्याचे आई आणि वडील दोघेही या जगात नाहीत. मोठ्या जिद्दीने आणि कठीण परिस्थितीत अनिमेशने हे यश मिळवले आहे. ही परीक्षा पास केल्यानंतर आता अनिमेशला आपल्या ओडिशा राज्याची सेवा करायची आहे.