नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला (मुख्य) २०१७ ते २०२१ या कालावधीत बसलेल्या परीक्षार्थींपैकी ६३ टक्के उमेदवार हे अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेचे पदवीधर होते. ही माहिती केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
त्यांनी सांगितले की, २०१७ ते २०२१ या कालावधीत नागरी सेवा परीक्षा (मुख्य) दिलेल्या ४,३७१ जणांनी विविध शाखांचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. त्यापैकी २,७८३ जणांनी अभियांत्रिकी शाखेतून, १०३३ जणांनी मानव्य शाखेतून, ३१५ जणांनी विज्ञान शाखेतून तर २४० जणांनी वैद्यकीय अभ्यासक्रमातून शिक्षण घेतले होते. या सर्व परीक्षार्थींमध्ये ५९७ जणांनी मानव्य शाखेतील तर २४३ जणांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कोणत्या विषयांना पसंती?उमेदवारांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, संस्कृत, तामिळ, तेलुगू, उर्दू, इंग्लिश, डोगरी, मैथिली या भाषांतून ही परीक्षा दिली होती. नागरी सेवा परीक्षा (मुख्य)साठी पर्यायी विषयांमध्ये राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगोल या विषयांना उमेदवारांनी अधिक पसंती दिली होती.