लखनौ-
उत्तर प्रदेशातील हापुड येथील पिलखुवाची रहिवासी असलेल्या शिवांगी गोयलनं यूपीएससी परीक्षेत देशात १७७ वी रँक पटकावली. तिनं जिल्ह्याचेच नव्हे तर पालकांचेही नाव उंचावले आहे. शिवांगीच्या घरी आज लोकांची गर्दी झाली आहे. शिवांगीनं तिच्या यशाचं श्रेय तिचे आई-वडील आणि आपल्या ७ वर्षांची मुलगी रैना अग्रवाल हिला दिलं आहे.
"जेव्हा मी शिकायचे तेव्हा माझे प्रिन्सिपल म्हणाले की तू चांगली तयारी कर आणि आयएएस अधिकारी बन, पण त्यानंतर माझा प्रवेश दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाला. मी दोनदा आयएएस परीक्षा दिली, त्यात माझी निवड झाली नाही. त्यानंतर माझं लग्न झालं. माझ्या सासरच्या घरी मला खूप त्रास दिला गेला. घरगुती हिंसाचाराला मी सामोरे गेले. म्हणून माझे वडील आणि आई मला घरी परत घेऊन आले", असं शिवांगीनं सांगितलं.
"मला एक लहान मुलगीही आहे. तरीही माझ्या वडिलांनी मला हवं ते करु देण्याचं स्वातंत्र्य दिलं. मला पुन्हा एकदा IAS अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली आणि मी रात्रंदिवस मेहनत करून २०१९ मध्ये लग्नानंतर पहिली परीक्षा दिली, ज्यामध्ये मी यशस्वी होऊ शकले नाही. आता तिसर्या प्रयत्नात माझी निवड झाली आहे, ज्यामध्ये माझा १७७ वा क्रमांक मिळाला आहे. माझा विषय समाजशास्त्र आहे. माझ्या यशाचं श्रेय मला माझ्या आई-वडिलांना आणि विशेषत: माझ्या मुलीला द्यायचं आहे ज्यांनी मला आयएएस होण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं. सासरच्या मंडळींकडून काही चुकीचं घडत असेल तर एक स्त्री आपल्या पायावर उभी राहू शकते, लिहिता-वाचू शकते आणि आयएएस अधिकारी होऊ शकते हे माझ्या उदाहरणातून महिलांना एक प्रेरणा देणारं आहे", असं शिवांगी म्हणाली.