Success Story: काहीतरी मोठं काम करण्याची जिद्द असेल, तर परिस्थितीवर मात करत तुम्ही त्या कामात नक्कीच यशस्वी होऊ शकता. दरवर्षी हजारो लोक UPSC ची परीक्षा देतात, पण फार कमी उमेदवार यात यशस्वी होतात. UPSC भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे, त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. आम्ही अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी कठोर परीश्रम घेऊन या परीक्षेत यश मिळवले.
पालघर जिल्ह्यातील बोईसर गावतील IAS वरुण बरनवाल अशा अधिकाऱ्यांपैकी आहेत, ज्यांनी अतिशय गरीब परिस्थितीत अभ्यास केला आणि अधिकारी होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, वरुण यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. पण, वडिलांच्या निधनानंतर लहान वयातच त्यांनी शाळेत जाणे बंद कले. वरुण यांचे वडील सायकल दुरुस्तीचे दुकान चालवायचे. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती.
वडिलांच्या निधनानंतर वरुण यांनी दुकानात काम सुरू केले. दुकानात काम करताना त्यांनी शाळाही सुरू ठेवली आणि दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. पण, परिस्थितीमुळे वरुण यांनी अकरावीत अॅडमिशन घेतले नाही. यानंतर वरुण यांच्या आईने दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने, वडिलांवर उपचार घेणाऱ्या डॉक्टरांनी वरुण यांच्या अभ्यासासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.
वरुण यांना नेहमीच डॉक्टर व्हायचे होते, पण वैद्यकीय शिक्षण खूप महाग असल्याने त्यांनी अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित करणे पसंत केले. वरुण यांनी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर त्यांनी आपल्या अभियांत्रिकी कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवली. शिष्यवृत्तीमुळे त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाले.
खासगी नोकरी करत असताना वरुण यांना सरकारी नोकरीचे वेध लागले. त्यांना एका स्वयंसेवी संस्थेकडून मदत मिळाली, ज्यांनी त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य पुरवले. सर्वांच्या मदतीमुळे ते UPSC परीक्षेत यशस्वी झाले.वरुण बरनवाल यांनी UPSC CSE 2016 परीक्षेत AIR 32 वा क्रमांक मिळवला आणि त्यांची IAS अधिकारी म्हणून निवड झाली. वरुण बरनवाल आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.