लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अमेरिकेचा भारतातील दूतावास जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज विचारात घेत असून त्यांच्या प्रवासात काही अडचणी येणार नाहीत याला प्राधान्य देईल, असे दूतावासातील कॉन्सुलर कामकाजाचे मंत्री डॉन हेफ्लीन यांनी रविवारी मुलाखतीत म्हटले.
हेफ्लीन म्हणाले,“ दूतावासाचा हेतू हा एक जुलैपासून दोन महिन्यांच्या मुलाखती सुरू करण्याचा आहे. सोमवारपासून हजारो मुलाखती सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांना त्यांची अपाईंटमेंट बुक करण्यासाठी त्यांनी वेबसाईटवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. लवकर अपॉईंटमेंटचे फेरवेळापत्रक असणार नाही म्हणून विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल, असे स्पष्ट करून डॉन हेफ्लीन म्हणाले की, मेपासून रद्द झालेल्या अपॉईंटमेंटस या आपोआप रिशेड्यूल्ड होत नाहीत.
उमेदवारांना पु्न्हा अर्ज मॅन्यूअली करावा लागेल. याशिवाय पालकांना विद्यार्थ्यांसोबत अमेरिकेत (बी वन,बी टू व्हिसा) येऊन त्यांची व्यवस्था लावण्यासाठी येण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांना स्वत: प्रवास करावा लागेल. ज्या पालकांकडे आधीच बी वन, बी टू व्हिसा आहे त्यांना विमान प्रवासासाठी एनआईची गरज असेल. दूतावास अशा प्रकरणात कोणतीही एनआयई जारी करणार नाही. डिपेंडंटस (स्पाऊज, कुटुंबातील सदस्य) एफ वन व्हिसा धारकांसोबत प्रवासाची तयारी करीत असतील तर त्यांनाही एनआयईअंतर्गत वगळण्यात आले आहे, असेही हेफ्लीन म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्रवासाच्या ७२ तास आधी आरटी पीसीआर चाचणी करून घेणे गरजेचे आहे. सध्या क्वारंटाईनची गरज नाही. व्हॅक्सीनेशन ॲक्सेप्डेट एन्ट्रीबद्दल ते म्हणाले की,“सध्या लसीकरणाचे प्रकार हे पूर्णपणे त्या त्या शाळांवर अवलंबून आहेत. ते तुम्हाला स्वीकारू शकतात किंवा तुम्ही कॅम्पसवर पोहोचल्यानंतर लस घ्या असेही म्हटले जाऊ शकते.”डॉन हेफ्लीन म्हणाले की,“शाळांनी उपलब्ध केलेले इलेक्ट्रॉनिक आय२० दूतावासाने स्वीकारलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट स्वत:सोबत ठेवणे आवश्यक आहे.
आर्थिक पुरावे मुलाखतीत दाखवण्याची गरज नाहीपूर्णपणे फंडेड विद्यार्थ्यांनी त्यांचे आर्थिक पुरावे व्हिसा मुलाखतीत दाखवण्याची गरज नाही. जर आय२० चा उल्लेख केलेला असेल तर तो पुरेसा आहे. वर्ग हे व्यक्तिश: असल्यामुळे विद्यापीठाकडून पत्राची गरज नाही. विद्यार्थ्यांनी युरोपमध्ये थांबा असलेले बुकिंग टाळावे कारण त्यांच्याकडे क्वारंटाईनची खूपच कठोर धोरणे आहेत, असेही त्यांनी मुद्दाम सूचवले.