चंद्रपूर: शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाशिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र इंग्रजी शाळांतील शिक्षकांना हा पुरस्कार दिला जात नाही. रिझर्ल्ट आणि गुणवत्ता देत असतानाही आम्हाला पुरस्कारापासून वंचित का ठेवल्या जाते, हा प्रश्न खासगी इंग्रजी शाळांतील शिक्षकांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात १ लाख ८ हजार एकूण शाळा आहे. यामध्ये प्रायव्हेट स्कूल ४१ हजार आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मिळून २०० च्यावर प्रायव्हेट शाळा आहे. यामध्ये ५ हजारांवर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, विविध मागण्यासाठी शिक्षक दिनी शिक्षक धरणे आंदोलन करणार असून शासनाचा लक्ष वेधणार आहे.
पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे
खासगी इंग्रजी शाळांची गुणवत्ता बघून मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातील पालक सुद्धा आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल करीत आहेत. मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळते, अशी त्यांची भावना आहे. मात्र त्यांना कामाचा मोबदला, तसेच अन्य सत्कार, पुरस्कारापासून वंचित राहावे लागते.
अभ्यासासह नृत्य, संगीत, गायनातही अव्वल
विद्यार्थ्यांच्या जडणघडणासाठी शिक्षकांची मोठी मेहनत असते. बहुतांश खासगी इंग्रजी शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, ई-लर्निंगचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकविल्या जात आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास कसा होईल, याकडे सुद्धा लक्ष दिल्या जाते. या शाळेतील खेळाडू विविध खेळात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून खेळात चांगले प्राविण्य प्राप्त करतात. तसेच सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणाला विशेष महत्त्व देऊन नृत्य, संगीत, गायन चित्रकला या क्षेत्रातही येथील विद्यार्थी प्राविण्य प्राप्त करीत आहे.
प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी बरीच मेहनत घेतो. गुणवत्तेमध्ये विद्यार्थी कुठेही मागे पडू देत नाही. असे असले तरी या शाळांतील शिक्षकांना पुरस्कार मात्र कधीच मिळत नाही. येथील ज्येष्ठ शिक्षक, कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत करावे व त्यांना यथायोग्य सन्मान द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार प्रशासनाकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. -विवेक आंबेकर, अध्यक्ष, म. रा. शिक्षक परिषद काँन्व्हेंट स्कूल विभाग, म. रा. शिक्षक-पालक एकता मंच
सोमवारी आंदोलन
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार (दि. ५) जिल्हा परिषदेसमोर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय नियमानुसार वेतन द्या, महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळावा, गॅज्युरिटी देण्यात यावी, शाळांतील आर्थिक घोळाची चौकशी करावी, आदी मागण्या आहे.