दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच...
अभ्यास, करिअर या सगळ्या आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी आहेत; पण नेमकं काही मुलांच्या बाबतीत त्या तितक्याशा सकारात्मक राहात नाहीत. याचं कारण नकारात्मक शब्दांची मालिका अभ्यासाला जोडून आलेली असते. जसं, माझं बरोबर असेल का, माझा अभ्यास झाला नव्हता, खूप चुकलं असेल का, भविष्याबद्दलची अपार भीती, वर्तमानात योग्य विचार करू न शकणं, अभ्यास, करिअर, दडपण, ओझं... अशा या नकारात्मक शब्दांच्या आणि भावनेच्या गुंत्यात आपण केव्हा अडकत जातो, हे कोणालाच समजत नाही.
या नकारात्मकतेत राहणं कोणासाठीच योग्य नाही. म्हणून कायम अनेक पर्यायांचा विचार करून ठेवायचा असतो. पर्याय आपल्याला हे सांगतात की, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर दुसरी गोष्ट आहे. ती करता येण्यासारखी आहे. यातून मनाला उभारी मिळते.
आपल्याकडे दहावी आणि बारावी या शब्दांना खूप महत्त्व आलेलं आहे. पण त्यातून बहुतांश मुलांचं नुकसानच जास्त होतं, हे लक्षात आल्यामुळे त्याचं महत्त्व कमी करण्याचाही प्रयत्न सातत्याने विविध पातळ्यांवर होत असतो. उदाहरणार्थ, गुणवत्ता यादी बंद करणं हे फार महत्त्वाचं पाऊल होतं. आता विविध विषयांच्या सीईटी होतात. बारावीला गुण कितीही असले तरी सीईटी असतेच. तिथे आपल्याला लगेच पुन्हा प्रयत्न करता येतात.
मुख्यत: लेखन, वाचन, स्मरणशक्ती यावर या परीक्षा आधारित असतात. या तीन कौशल्यांवर आधारित अनेक परीक्षा आपण देऊ शकतो. त्यात छान पद्धतीने यशस्वीही होऊ शकतो; पण आयुष्य या तीन गोष्टींपुरतं मर्यादित नसतं. त्यासाठी सहनशक्ती, उद्योजकता, सृजनशीलता, आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जमल्या पाहिजेत. कधी कोणती गोष्ट लागेल, हे सांगता येत नाही.
आपण या गोष्टी जमवायच्या ठरवल्या की त्या जमतात. आयुष्य जमून येण्यासाठी हेच आवश्यक असतं. अंधाराच्या वेळा येतात आणि जातात... त्या अंधारात हरवून जायचं नाही; आपला आपण उजेड करायचा एवढं ठरवलं तरी पुरे आहे!
पालकांनी लक्षात ठेवावं...मुलांना ताण असतोच, त्यांनी चेहऱ्यावर किंवा वर्तनातून दाखवला, नाही दाखवला तरी ताण असतोच. त्यात आपण नकारात्मक शब्द बोलत राहिलो, तर तो ताण अजून वाढतो. नकारात्मक भावना अजून वाढतात आणि मुलं विचार करत करत कुठे जाऊन पोहोचतील आणि काय कृती करतील, हे सांगता येत नाही.
या काळात मुलं बहुतेकवेळा पालकांच्या आसपास असतात. कारण शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असते. अशावेळेला शब्द जपून वापरा. सगळं नीट होईल, आयुष्य कधी थांबत नसतं, अडचणी आल्या तरी त्यातून वाट काढायची असते, कोणतीच परीक्षा कधीच अंतिम नसते, एक दार बंद झालं तर दुसरी अनेक दारं उघडत असतात, अनेक शक्यता निर्माण होत असतात... अशा शब्दांची पेरणी अधूनमधून करत राहायला हवी. कारण हे सकारात्मक शब्द आहेत. जीवन कसं जगायचं असतं, हे दर्शविणारे हे शब्द आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूत ‘आनंदाची रसायनं’ निर्माण करणारे हे शब्द आहेत.- डॉ. श्रुती पानसे, करिअर समुपदेशक