- ऋषिराज तायडे(उपसंपादक)
चौकातील सिग्नल सुरू असला तरी तो बिनदिक्कतपणे तोडणे, ट्रेन वा बसच्या खिडकीतून कचरा बाहेर टाकणे, ज्येष्ठ नागरिक वा महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसणे, अशा एक ना अनेक गोष्टी आपण दररोज करतो. त्याचे कारण म्हणजे याबाबतच्या मूलभूत गोष्टींची शिकवण आपल्याकडे दिली जात नाही, परंतु जपानमध्ये हे चित्र उलट आहे. तेथे प्राथमिक शाळांमध्ये मूल्यशिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाते. परिणामी जपानी नागरिक हे त्यांच्या कार्यक्षमता आणि नम्रतेसाठी जगभर ओळखले जातात.
आयुष्यात काहीतरी मोठं होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे आपण अनेकदा ऐकतो. परंतु एखाद्-दुसरी पदवी घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची, हाच आपल्याकडील शिक्षणाचा सर्वसामान्य हेतू. त्यादृष्टीनेच अगदी प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत धडे दिले जातात. परंतु हुशार विद्यार्थी होण्यापेक्षा जबाबदार नागरिक व्हावा, यासाठी आपल्याकडील शाळांमध्ये फारसे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. कारण अभ्यासक्रमाचाच भाग असलेल्या मूल्यशिक्षण, कार्यानुभाव, शारीरिक शिक्षण, यासारख्या विषयांकडे लक्षच दिले जात नाही. अनेक शाळांमध्ये तर या विषयांच्या तासिकांना नियमित विषयांचे तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरच दिला जातो. मग प्रश्न पडतो, की अभ्यासक्रमांमध्ये हे विषय का दिले असावेत? त्याचं सरळसोपं उत्तर आहे की पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्याला ‘माणूस’ म्हणून घडविणे.
एकीकडे भारतीय शिक्षण पद्धतीत हे चित्र असताना, जपानमध्ये मात्र फार वेगळे चित्र पाहायला मिळते. तेथील शिक्षण व्यवस्थाच विद्यार्थ्यांना ‘माणूस’ म्हणून घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. चौथ्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षाच घेतल्या जात नाहीत. कारण जपानी लोकांचा विश्वास आहे की, या वयात पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना स्वतःची कामे स्वतः कशी करावी, सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे, लोकांशी विनम्रतेने कसे बोलावे, एकमेकांना मदत कशी करावी, टीमवर्कने काम कसे करावे, वेळेच भान कसे जपावे, हे जास्त महत्त्वाचे आहे. परीक्षेचा वा अभ्यासाचा ताण नसल्याने आपसूकच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती १०० टक्के असते. यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत देशाचा उत्तम नागरिक म्हणून त्यांना घडविले जाते.
आनंददायी जीवनाचे धडेजपानी शिक्षण पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना आनंदी जीवनाचे धडे दिले जातात. आयुष्यात किती व्यस्त असा, कितीही आव्हाने वा दडपण आले, तरी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे शिकविले जाते. त्यामुळे जपानी लोक कित्येक तास आनंदाने काम करताना दिसतात.
कोणत्या गोष्टींवर दिला जातो भर? ज्ञानापेक्षा सवयींना प्राधान्यशाळेतील पहिली तीन वर्षे विद्यार्थ्याला अभ्यासापेक्षा चांगल्या सवयी, व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जातात. इतरांविषयी आदर, विनम्रता, सहानुभूती बाळगण्याचेही शिकविले जाते. स्वच्छतेचे धडे जपानमधील अनेक शाळांमध्ये सफाई कर्मचारी नसतोच. विद्यार्थीच आपापले वर्ग, कॅन्टीन, स्वच्छतागृह स्वच्छ करतात. या सवयींमुळे त्यांच्यात स्वच्छतेचे महत्त्व रुजवले जाते.पोषक व सकस आहारविद्यार्थ्यांचे योग्य पद्धतीने भरणपोषण व्हावे, म्हणून त्यांना शिक्षकांसोबत शाळेतच पोषक व सकस आहार दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाते.विविध कार्यशाळाशालेय शिक्षण संपले, तरी पुढील शिक्षणाच्या हेतूने तसेच विविध विषयांच्या मार्गदर्शनासाठी शाळांमध्ये वेगवेगळ्या वर्कशॉप्सचे नियमित आयोजन केले जाते.
जपानी नागरिकांकडून काय शिकावे?सतत सक्रिय राहा : तुमच्याकडे फावला वेळ असला, तरी त्यात शक्य तो स्वतःला कोणत्या तरी कामात गुंतवून ठेवा. अगदी केर काढण्यापासून ते एखादे चित्र काढणे आदी कामे करू शकता.स्वतःसाठी जगा : कायम दगदगीचे आणि धावपळीचे आयुष्य दीर्घायुष्याला घातक आहे. स्वतःला समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वेळ द्या.चांगला मित्रपरिवार : उत्तम आयुष्यासाठी मित्रपरिवार चांगला असावा, यावर जपानी लोक भर देतात. तेथील शाळेत दिले जाणारे टीमवर्कचे धडे चांगले मित्र तयार करण्यासाठी उपयोगी पडतात.निसर्गाशी जोडून घ्या : आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी निसर्गाच्या अधिक सानिध्यात राहण्यावर भर द्या. त्यासाठी जपानमध्ये पर्यावरणाचे बाळकडू शाळेतच दिले जाते.कृतज्ञता बाळगा : तुम्हाला जे काही आज मिळतेय आणि ज्यांच्यामुळे मिळतेय, त्यासाठी त्यांच्याप्रति कृतज्ञता बाळगा. विनम्रता हा जपानी लोकांच्या आयुष्याचा सर्वांत मोठा गुण आहे.