मुंबई: नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय नेमके किती असावे, हा काही गेल्या वर्षापासून चाललेला घोळ अखेर सरकारने संपवला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी करून पालकांना दिलासा दिला आहे. प्ले ग्रुप नर्सरी आणि पहिलीतील प्रवेश घेताना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचे आरटीई तसेच नवीन वर्षात शाळांमध्ये प्रवेश घेतानाचे वय निश्चित करण्यात आले आहे.
शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून मानवी दिनांक बदलामुळे संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्षात सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. शाळांना पूर्वप्राथमिकसाठी कमी-जास्त वयाची कारणे देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२२ अखेर प्रवेशासाठी निश्चित असलेले वय असावे लागणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे. किती वर्षासाठी पूर्वप्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश द्यावा, हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीई २५ टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेताना किमान वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
पालकांमध्ये होता संभ्रम
प्रवेश अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती संचालनालायकडून देण्यात आली आहे.
१० मार्चपर्यंत मुदतवाढ
आरटीई प्रवेशाच्या अजार्साठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठी वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशाच्या अजार्साठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
५७६६ अर्ज सादर
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ३ हजार १४७ जागांसाठी आतापर्यंत ५ हजार ७६६ पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहे.
प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय |
प्ले ग्रुप / नर्सरी | १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस |
ज्युनिअर केजी | १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ | ५ वर्ष ५ महिने ३० दिवस |
सिनिअर केजी | १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ | ६ वर्ष ५ महिने ३० दिवस |
पहिली | १ जुलै २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ | ७ वर्ष ५ महिने ३० दिवस |