लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी १० वाजता विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनमध्ये त्याला मिळालेल्या महाविद्यालयांची यादी दिसणार आहे. शिवाय महाविद्यालयांचे कट ऑफही संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
मुंबई विभागाच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये ९० टक्क्यांवर राज्य मंडळाचे ७ हजार ९४६ विद्यार्थी आहेत, तर सीबीएसई मंडळाचे १ हजार ५७३ व आयसीएसई मंडळाचे ३ हजार ८४५ विद्यार्थी आहेत. ८० टक्क्यांच्यावर राज्य मंडळाचे ३९ हजार ११५ विद्यार्थी आहेत. सीबीएसईचे १,८७४ व आयसीएसई मंडळाचे ३,४५४ विद्यार्थी आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत किती विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार आणि त्यात पसंतीचे महाविद्यालय कोणाला मिळणार, यात चुरस असणार आहे.
मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण ३,७१,२७५ जागा उपलब्ध आहेत. यामधील कॅप फेरीतून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या २ लाख ३० हजार ९२७ असून कोट्याच्या १ लाख ४० हजार ३३८ जागा आहेत. याउलट मुंबई विभागातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लक्ष ८ हजार इतकी आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये किती विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीप्रमाणे मुंबई विभागात ९५ ते १०० टक्क्यांमधील तब्बल३,७८३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
७५ ते ९५ टक्क्यांमध्ये तब्बल १० हजार २६० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. ७५ टक्क्यांखालील १ लाख ७४ हजार ४३७ विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत कोट्याच्या उपलब्ध १.४० लाख जागांपैकी १४ हजार २२६ जागांवर प्रवेश झाले असून त्यातील १ लाख २६ हजार १२२ जागा अद्याप रिक्त आहेत.