- रेश्मा शिवडेकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी विद्यार्थ्यांच्या वयाबाबत असलेला संभ्रम कायम आहे. अडीच वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला नर्सरीत प्रवेश द्यायचा की तीन, याबाबत शाळांमध्ये गोंधळाचे वातावऱण असून हा संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या वयासंबंधीच्या नियमानुसार सध्या साडेपाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश देता येतो. कारण ,शिक्षण हक्क कायद्यानुसार वय वर्षे सहापर्यंतचे शिक्षण कायद्याच्या चौकटीत येत नाही. शाळा याचा फायदा घेत अडीच वर्षांच्या मुलांनाही नर्सरीत प्रवेश देतात. दुसरीकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार नर्सरीकरिता वय वर्षे तीन पूर्ण केलेली असावी. जेणेकरून मूल पहिलीत येईपर्यंत ते सहा वर्षांचे असेल. परंतु, त्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणविषयक कायदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे नर्सरीसह, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी शिक्षणाचेही नियमन होईल.
बदल लवकरच होणार महाराष्ट्रात वयाबाबतच्या जुन्याच नियमांचा आधार घेतला जात आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुरूप त्यात बदल करण्याची मागणी ‘अर्ली चाईल्डहुड असोसिएशन -प्राथमिक शिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या अध्यक्ष डॉ. स्वाती पोपट-वत्स यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून कायद्यात बदल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, असे वत्स यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या संभ्रमाबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, तीन वर्षे पूर्ण झालेल्यांनाच नर्सरीत प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असेल. २०२४-२५ पासून हा बदल लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
मुलांच्या वयातील फरक अवघ्या तीन ते सहा महिन्यांचा असला, तरी या वयात त्यांना ज्या पद्धतीने शिकविले जाते त्याचा परिणाम त्यांच्या भाषा, सामाजिक-भावनिक विकासावर होतो. पुढे अनेक हानीकारक परिणामांना आयुष्यभर त्यांना सामोरे जावे लागते.- स्वाती पोपट-वत्स