नवी दिल्ली – देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या निकालाची घोषणा केली. या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवारांनी यश मिळवलं. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील शुभम कुमारने सिविल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा २०२० मध्ये टॉप करत IAS होण्याचं स्वप्न साकार केले आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का? भारतातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान कुणाला जातो?
१८५४ मध्ये नागरी सेवा परीक्षेची सुरुवात
UPSC वेबसाईटनुसार, इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परीक्षेला १८५४ मध्ये सुरुवात केली होती. संसदेच्या सिलेक्ट कमिटीचे लॉर्ड मैकाले यांच्या रिपोर्टनंतर त्याला मान्यता दिली. त्याआधी नागरी सेवकांची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात होती. त्यांना लंडनच्या हेलीबरी कॉलेजमध्ये ट्रेनिगनंतर भारतात आणलं जायचं. १८५४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. १८५५ मध्ये लंडनमध्ये परीक्षेला सुरुवात झाली. त्यात किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष वय असणं बंधनकारक होतं. ही परीक्षा भारतीयांसाठी खूप कठीण समजली जायची.
कोण होते भारताचे पहिले IAS अधिकारी?
रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय होते ज्यांनी १८६४ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलं होतं. सत्येंद्रनाथ टागोर आयएएस अधिकारी बनणारे पहिले भारतीय होते. सत्येंद्रनाथ टागोर परीक्षेच्या तयारीला १८६२ मध्ये भारतातून इंग्लंडला गेले होते. त्यांची १८६३ मध्ये नागरी सेवेसाठी निवड झाली. १८६४ मध्ये इंग्लंडमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर सत्येंद्रनाथ भारतात परतले. ते अधिकृतरित्या भारताचे पहिले IAS अधिकारी बनले होते. त्यानंतर बॉम्बे प्रेसीडेंसीमध्ये ते तैनात होते. काही महिन्यांनी अहमदाबाद शहरात त्यांची बदली झाली.
१ जून १८४२ मध्ये सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म
सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म १ जून १८४२ मध्ये झाला होता. हिंदू स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून परीक्षा देणारे ते पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक होते. सत्येंद्रनाथ टागोर यांचा विवाह १७ व्या वर्षी ज्ञानदानंदिनी देवी यांच्याशी झाला. जेव्हा सत्येंद्रनाथ आयएएस अधिकारी बनले तेव्हा त्यांचे वय केवळ २१ वर्ष होतं. सत्येंद्रनाथ टागोर यांनी प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य निभावलं. ते साहित्य क्षेत्रातील कुटुंबातून येत होते. त्यामुळे त्यांनी साहित्य क्षेत्रात बरेच काम केले.