NEET UG Exam Latest Updates: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार नीट प्रवेश पूर्व परीक्षा यावर्षी कशी होणार, याची चर्चा आहे. केंद्र सरकारकडून परीक्षेच्या स्वरूपात बदल केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे. ऑफलाइन म्हणजे पेपर-पेन की ऑनलाइन घ्यायची याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट यूजी पेन-पेपरने घ्यायची की, ऑनलाइन पद्धतीने घ्यायची, याबद्दल शिक्षण आणि आरोग्य मंत्रालय सातत्याने चर्चा करत आहेत. यासंदर्भातील निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे."
धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी बोलताना ही माहिती दिली. शिक्षण मंत्रालय आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य मंत्रालय यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, असे प्रधान यांनी सांगितले.
एनटीए फक्त प्रवेश पूर्व परीक्षा घेणार
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, २०२५ पासून एनटीए उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रवेश पूर्व परीक्षाच घेईल. कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या रचनेत २०२५ मध्ये बदल होतील, १० नवीन पदे निर्माण करण्यात आली असून, परीक्षेतही सुधारणा केल्या जातील, असे प्रधान यांनी सांगितले.
नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर केंद्र सरकारकडून बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ही परीक्षा लेखी न घेता ऑनलाइन घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.