लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीबीएसई दहावीची परीक्षा सोमवारपासून इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. पहिल्याच पेपरमधील एका प्रश्नाचे पर्यायच चुकीचे असल्याची बाब विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडविणारी ठरली. ‘ मिस्टर किसिंग हा व्यक्ती कोण होता ? ’ असा हा प्रश्न होता. तो गणित शिक्षक होता असे स्पष्ट उत्तर पाठ्यपुस्तकात आहे. मात्र प्रश्नपत्रिकेत हा पर्यायच नसल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले.
सीबीएसईच्या दहावी परीक्षेतील इंग्रजी पेपरमध्ये सेक्शन ‘ सी’ च्या ‘ लिटरेचर ’ वरील प्रश्नात ‘ मिस्टर किसिंग कोण होता ? हा प्रश्न होता. त्याखाली इंग्रजी शिक्षक, सोशल सायन्स शिक्षक, वार्डन आणि प्रिन्सिपल अशा चार पर्याय दिलेले होते. वास्तविक इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तो गणित शिक्षक होता हे उत्तर आहे. मात्र पर्यायांमध्ये हे उत्तरच नसल्याने परीक्षार्थी चांगलेच गोंधळले.
याबाबत सीबीएसई शाळेच्या एका इंग्रजी शिक्षिकेला विचारले असता त्यांनी प्रश्नाखाली दिलेले पर्यायच चुकीचे असल्याचे ठासून सांगितले. या प्रश्नाला एक गुण होता. ज्यांनी तो प्रश्न सोडवला त्यांना गुण मिळायला हवे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.