- राहुल शिंदेपुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु, मे महिना संपत आला, तरीही अद्याप बालभारतीचे पुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात पुस्तकांविनाच शिक्षण सुरू करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.राज्य शासनातर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून नऊ कोटी पुस्तकांची छपाई केली जाते. मात्र, यंदा पुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत पुस्तकेच उपलब्ध होणार नाहीत. बालभारतीकडे मागील वर्षाचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे. तसेच, उपलब्ध असलेला कागद वापरून काही पुस्तकांची छपाई करण्यात आली. परंतु, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुरतील एवढ्या पुस्तकांची छपाई झालेली नाही.
छपाईच्या कागदावरून वाद?बालभारतीच्या पुस्तक छपाईसाठी दर्जेदार कागद वापरला जातो. रिसायकल केलेला कागद वापरल्यास त्यातून शाई फुटण्याची शक्यता असते. तसेच, पर्यावरणाची हानी न करता तयार केलेल्या कागदावर बालभारतीच्या पुस्तकांची छपाई केली तर कोणतीही अडचण येत नाही. हीच बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.