लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मात्र, यंदा बालभारतीकडून पुरेशा पुस्तकांची छपाईच झाली नाही. त्यामुळे मंगळवारपासून (दि.१५) पुस्तकाविना शाळा होणार आहेत.
राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बालभारतीला सुमारे दोन कोटी पुस्तकांची छपाई करता आली नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच पडले नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात कोरी करकरीत पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना हा आनंद मिळणार नाही. त्यातच पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांना विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके जमा करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यंदा जुनीच पुस्तके मिळणार आहेत.जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळांनासुद्धा विद्यार्थ्यांना निकाल वाटप करताना त्यांच्याकडून जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात किती जुनी पुस्तके जमा झाली आहेत किंवा यापुढील काळात ही जुनी पुस्तके जमा केली जाणार आहेत, हे पहावे लागणार आहे.
पुस्तकांशिवाय ऑनलाइन शिक्षणशाळांबरोबरच बाजारातही काही पुस्तकांचा तुटवडा आहे. इयत्ता सहावीची इंग्रजी माध्यमाची इतिहास आणि इंग्रजी या विषयाची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्यातरी विद्यार्थ्यांना पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.