- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी गतवर्षी मुले मिळाली नसल्याने प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीसुद्धा बऱ्याच जागा रिक्त राहिल्याने गतवर्षाची प्रक्रिया अर्धवटच राहिली. गतवर्षीचा हा गोंधळ संपत नाही, तोच नववर्षातील २५ टक्के प्रवेशाला सुरुवात झाली आहे. ‘आरटीई’साठी २१ जानेवारीपासून शाळा नोंदणी सुरू झाली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया कोरोनामुळे गतवर्षी अडचणीत सापडली होती. लॉकडाऊनपूर्वी पालकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु, कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याकडे पालकांनी पाठ फिरविली. प्रवेश होऊ शकले नाही, त्यामुळे अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे गतवर्षी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला असताना आता २०२१-२२ या नवीन वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जानेवारीपासून आरटीई प्रवेशपात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
शाळांना दिली ८ फेब्रुवारीची मुदत
ऑनलाइन नोंदणीसाठी शाळांना ८ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीकरिता १५ दिवसांचा कालावधी शाळांसाठी देण्यात आला आहे. आरटीई प्रवेशपात्र २०२०-२१ च्या ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची पडताळणीही या कालावधीत करण्यात येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
१) शाळांची नोंदणी - २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी
२) पालकांनी ऑनलाइन अर्ज भरणे - ९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी
३) सोडत (लॉटरी) काढणे - ५ मार्च ते ६ मार्च
४) कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष प्रवेश निश्चित - ९ मार्च ते २६ मार्च
५) प्रतीक्षा यादी - २७ मार्चनंतर