नवी दिल्ली : अतिपाऊस, अतिउष्णतामान, अतिथंडी हे चक्र सध्या सुरू आहे. हवामानातील बदलांमुळे निसर्गचक्रात हा बिघाड निर्माण झाला आहे. त्याचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हवामान बदलांचे हे परिणाम २०३० पर्यंत तीव्र होत जाणार असून दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांचा सामना पृथ्वीवासीयांना करावा लागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात दिला आहे.
युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन (यूएनडीआरआर) यांनी हा अहवाल तयार केला असून सद्यस्थिती पाहता येत्या आठ वर्षांत जगभरात दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नैसर्गिक संकटांचे हे प्रमाण २०१५ पासून दरवर्षी ४०० असे आहे.
काय सांगतो अहवाल?२०३० पर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढेल. दुष्काळाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढेल. गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाईल.
हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांची आताच गंभीर दखल घेणे नितांत गरज आहे. नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसान ‘भूतो न भविष्यति’ असेल. - मामी मिजुटोरी, यूएनडीआरआरच्या प्रमुख.
नैसर्गिक संकटांमुळे १९९० च्या दशकात जगाला ७० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. आता हे प्रमाण १७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटेच नव्हे तर कोरोना महासाथ, आर्थिक संकटे व खाद्यान्नांची टंचाई यांमध्येही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.