- गजानन दिवाणऔरंगाबाद : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कार्बन उत्सर्जन कमी झाल्याने जगभरातील पर्यावरणप्रेमींच्या आशा उंचावल्या. मात्र, हा आनंद क्षणिक ठरत आहे. लॉकडाऊनमधून बाहेर येताच भारतासह जगभरातील सर्वच देश तापमानवाढीच्या वाटेवर येऊ लागले आहेत. संयुक्त राष्टÑाने प्रकाशित केलेल्या अहवालात यावर चिंता व्यक्त केली आहे.जंगलात आग लागणे, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ पडणे, तापमान वाढणे आदी धोके वाढत असल्याचे संयुक्त राष्टÑाने म्हटले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात जगभरात चार ते सात टक्के प्रदूूषण कमी झाले. एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन डायआॅक्साईडचे उत्सर्जन १७ टक्के कमी नोंदविले गेले. मात्र, जून महिन्यात हे प्रमाण ५ टक्क्यांवर आले. हे चिंताजनक असून पर्यावरणाशी जुळवून घेत जगण्याचा सल्ला कोरोना महामारीने सर्व जगाला दिला असल्याचे संयुक्त राष्टÑाने या अहवालात म्हटले आहे.पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला सुरक्षित ठेवण्यात ओझोनच्या थराचा मोठा वाटा आहे. सूर्यापासून येणाऱ्या मध्यम अतिनील किरणांना हा थर रोखून धरत आपली रक्षा करीत असतो. मात्र, माणसाच्या निसर्गविरोधी वागण्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनच्या थराला मोठी छिद्रे पडली आहेत. नासाने याचा अभ्यास सुरू केला आहे. माणसावर या ‘ओझोन होल’चे अनेक दुष्परिणाम होतात.पृथ्वीची ढाल :ओझोनचा थर वातावरणातील एक छोटासा तुकडा आहे. ओझोनचा हा थर पृथ्वीवरील जीवांची ढाल म्हणून काम करीत असतो. पृथ्वीवरील जीवन सूर्यप्रकाशाशिवाय शक्य होणार नाही; पण सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून ओझोनचा हा थर पृथ्वीची सुरक्षा करतो.ओझोनची ही ढाल कमकुवत झाल्यास आपली रोप्रतिकारशक्ती कमी होते. त्वचेच्या कर्करोगासारख्या महाभयंकर रोगाला आपल्याला सामोरे जावे लागते. पृथ्वीवर वाढणारा नायट्रोजन आॅक्साईड वायू ओझोनच्या थराला धोकादायक ठरत आहे.१६ सप्टेंबर १९८७ रोजी ओझोन थराच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्टÑ आणि इतर ४५ देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली, तेव्हापासून १६ सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो.
लॉकडाऊननंतर जग पुन्हा जागतिक तापमानवाढीच्या वाटेवर
By गजानन दिवाण | Published: September 16, 2020 2:43 AM