संदीप आडनाईककोल्हापूर -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या प्रदेशनिष्ठ माशाच्या संवर्धनासाठी २.११ हेक्टर मंदिर परिसराला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांच्या स्वाक्षरीने राज्य सरकारने बुधवारी अधिसूचना काढली आहे.देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी कॉन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून स्थानिकांच्या मदतीनेच या प्रदेशनिष्ठ माशाचे संवर्धन करण्यात येणार आहे. ही नवी प्रजात भारतातल्या सर्वात सुंदर माशांच्या प्रजातीपैंकी एक असल्याने तिला मत्स्यालयांसाठी होणाऱ्या अवैध व्यापाराचा धोका आहे.गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या शोधाविषयीचा संशोधन निबंध 'एक्वा, इंटरनॅशनल जर्नल ऑफ इक्थिओलॉजी' या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला होता. या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी लावला होता. गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या हा मासा केवळ आंबोलीतील महादेवाच्या मंदिरासमोरील कुंडामध्ये आणि त्याशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशी नदी उगमाच्या प्रवाहामधून 'शिस्टुरा' कुळातील या प्रजातीचा उलगडा करण्यात आल्याने तिचे नामकरण 'शिस्टुरा हिरण्यकेशी', असे करण्यात आले.या माशाचा आकार ३३ ते ३७.८ एमएम असून तो झूप्लॅक्टन, शैवाळ आणि छोटे कीटक खातो. २०१२ साली सर्वप्रथम तेजस ठाकरे यांना आंबोलीमधील हिरण्यकेशी नदीच्या मुखाजवळील कुंडामध्ये ही प्रजात दिसली होती. हे अधिवास क्षेत्र मर्यादित असल्याने माशासोबतच या जागेचे संवर्धन आवश्यक होते.या माशाचे अधिवास क्षेत्र लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी 'ठाकरे वाईल्ड फाऊंडेशन' (टीडब्लूएफ) आणि 'मलाबार नेचर कॉन्झर्वेशन ट्रस्ट'च्या (एमएनसीटी) संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबविले होते. 'टीडब्लूएफ'चे स्वप्निल पवार आणि वन्यजीव रक्षक 'एमएनसीटी'चे महादेव भिसे यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली होती. 'टीडब्लूएफ'चे प्रमुख आणि वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांनी वन विभागाच्या सचिवांना पत्र लिहून हा परिसर 'हिरण्यकेशी जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
आंबोलीच्या देवमाशाच्या जागेला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 8:17 PM
Amboli hill station ForestDepartment Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या प्रदेशनिष्ठ माशाच्या संवर्धनासाठी २.११ हेक्टर मंदिर परिसराला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांच्या स्वाक्षरीने राज्य सरकारने बुधवारी अधिसूचना काढली आहे.
ठळक मुद्देआंबोलीच्या देवमाशाच्या जागेला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा तेजस ठाकरे यांचे संशोधन : 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी अधिसूचना