मुंबई: मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात आता आणखी वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्याचे सरासरी कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश नोंदविण्यात येत आहे. तापमानाचा पारा वाढत असताना आता २४ आणि २५ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला गारांचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करता विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे.
२४ आणि २५ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल. २६ मार्च रोजी याच ठिकाणी गारांचा पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता येथील आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान मात्र ३५ अंश नोंदविण्यात येईल. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईतील रहदारी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, येथे आता काही प्रमाणात उकाड्याने वेग पकडला आहे. परिणामी मुंबईकर घामाघूम होत आहेत.