प्रगती जाधव-पाटील
सातारा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी निसर्गात असलेलं प्लास्टिक बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. हेच हेरून कऱ्हाड पालिका आणि फ्रेंडस् नेचर क्लबच्यावतीने घरातील प्लास्टिक गोळा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी तब्बल २ टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जातात; पण पुढच्या पिढीला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील बनविताना त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी कऱ्हाड नगरपालिका आणि एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गादीच्या खाली, स्वपयंपाक घरात यासह घरात ठिकठिकाणी असलेलं प्लास्टिक शोधून विद्यार्थ्यांनी शाळेत आणून जमा केलं. सर्वाधिक प्लास्टिक घराबाहेर काढणाऱ्या विद्यार्थ्याचा अनोखा गौरव मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी तीन वाजता पालिकेच्या सभागृहात होणार आहे. शहरातील १५ माध्यमिक शाळेतून सुमारे १२ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी शासनाने बंदी घातलेलं सर्व प्लास्टिक घरातून बाहेर काढून शाळेत जमा केलं.
येणारे २०२० साल प्लास्टिकमुक्त म्हणून त्याचे स्वागत करूया. या सर्व कामामध्ये गुंतले आहेत. शंभरहून अधिक कर्मचारी, क्लबचे सर्व पदाधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक गोळा करून पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकले आहे. पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जालिंदर काशीद
प्लास्टिक फ्री होममध्ये सहभागी शाळा...!
कऱ्हाड शहरातील विटामाता विद्यालय, उर्दू हायस्कूल, टिळक हायस्कूल, कन्या शाळा, का. ना. पालकर शाळा माध्यमिक, महाराष्ट्र हायस्कूल, यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, केशवराव पवार स्कूल, कऱ्हाड नगरपालिका शाळा ३, सरस्वती विद्यामंदिर, वाखाण, एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल, नूतन मराठी शाळा, शिवाजी विद्यालय या शाळांनी उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.नेचर इन निड, कऱ्हाड
- १२ हजार विद्यार्थी- १५ शाळा- १०० आरोग्य कर्मचारी- २ टन प्लास्टिक कचरा गोळा