अकोला : नव्या व जुन्या अकोला शहराची विभाजन रेषा म्हणून वाहत असलेल्या मोर्णा नदीची स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुरती वाताहत झाली असून, स्वच्छतेकडे लक्ष दिल्या जात नसल्यामुळे आज रोजी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी फाेफावली आहे. पाण्याचा प्रवाह अडविणाऱ्या या वेलवर्गीय वनस्पतीचा फास दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असल्यामुळे कधीकाळी खळखळून वाहणाऱ्या मोर्णा नदीचा श्वास गुदमरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली मोर्णा नदी ही अकोला शहराच्या मध्य भागातून वाहते. कधीकाळी स्वच्छ व निर्मळ पाणी असलेल्या मोर्णा नदीला शहरातील सांडपाण्यामुळे चक्क गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे, तर नदीपात्रात जलकुंभीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलकुंभी व नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला आहे. साचलेल्या पाण्यात सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात प्रचंड दुर्गंधीचे वातावरण आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. एकेकाळी शहराचे वैभव असलेल्या नदीच्या स्वच्छतेकडे मात्र प्रशासन कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.
मोर्णा स्वच्छता मिशन बासनात
तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मोर्णा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये मोर्णा स्वच्छता मिशन सुरू केले होते. प्रशासन व लोकसहभागातून सुरू झालेल्या या मोहिमेला त्यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांत नदीपात्रातील जलकुंभी हटविण्यात येऊन अनिकट परिसरात घाट व नदी सौंदर्यीकरणाचे कामही करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांची बदली होताच ही मोहीम गुंडाळण्यात आल्याने नदीची पुन्हा बकाल अवस्था झाली आहे.