बी. एन. शिंदे
अहमदनगर - मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते. ते आक्राळ-विक्राळ रूप धारण करते. मानवासह जिवाणूंनाही ते घातक ठरते.
गणेशोत्सव आपल्याकडे पारतंत्र्यात सुरू झाला. लोक यामुळे एकत्र आले. प्रबोधनाबरोबरच ब्रिटिशांविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा हेतूही सफल झाला; परंतु अलीकडे अफाट लोकसंख्या असलेल्या शहरी भागात उत्सव साजरे होतात. त्यातून ध्वनी, माती, पाणी, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदूषणाबरोबर हवेचेही प्रदूषण प्रचंड वाढले. त्यामुळे नवनवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अलीकडे मंडळांची संख्या भरमसाट वाढून मंडपांचा अतिरेक होऊन मूलत: कार्बनडाय ऑक्साईड धूर व वाढलेल्या तापमानाची भर पडून हवा अधिक प्रदूषित होते. या उत्सवात मुंबई पुण्यातून अनेक लोक सुटी घेऊन खेड्यात येतात, तर खेड्यातील लोक पाहुणे म्हणून मोटारीने शहरात जातात. त्यामुळे इंधनाचे ज्वलन कित्येक पटीने वाढते. वाहतूक कोंडीमुळे हवा जास्तच प्रदूषित होऊन दम्यासारखे आजार बळावतात़ प्रचंड गर्दीच्या शहरात गणेशोत्सवात लाखो लोक ये-जा करतात. या काळात इंधन ज्वलन वाढते शिवाय विद्युत रोषणाईसाठी विजेचा वारेमाप वापर होतो. त्यामुळे प्रदूषणाबरोबर तापमान वाढून हवामानात बदल होतो.
पर्यावरणपूरक उत्सव
विसर्जनावेळी निर्माल्य, केमिकल असलेल्या गणेशमूर्ती पाण्यात टाकल्यामुळे पाण्याबरोबर संयोग होऊन नवनवीन धातू वातावरणात मिसळतात़ सार्वजनिक गणपती उत्सवामुळे कलाविष्कार, उत्साह, सांस्कृतिक ऐक्य व काही प्रमाणात प्रबोधन जरूर होते; पण ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. ते मागे पडून सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते का, याचा विचारही व्हायला हवा. प्रदूषणाला फाटा देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे.
आजार पसरतात
निर्माल्य, प्रसाद आदी वस्तू जवळपास टाकल्या जातात. हा उत्सव हवा शांत असताना पावसाळ्यात येतो. त्यामुळे निर्माल्यामुळे विविध वस्तू जागेवरच सडतात. परिणामी, दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरात अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण होते.
गणरायाला निरोप देताना फटाके फोडण्याची गणेश मंडळांत स्पर्धा लागते. त्यातून धूर, धूळ, कचरा आणि कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मेनाक्साईड यासारखे विषारी वायू पसरून हवा अधिक प्रदूषित होते.
(लेखक हवामानतज्ज्ञ आहेत)