सुमेरा अब्दुलअली
मुंबई - केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. शांतता क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, अशा क्षेत्रांत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषणाचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतात. या कारणात्सव आरोग्य जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनाच आर्त हाक देण्याची गरज आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ज्या ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र आहे, तेथे वाद्यवृंद वाजवू नका. रुग्णालयाच्या परिसरात वाद्यवृदांचा आवाज होणार नाही, याची काळजी घ्या. गणेशोत्सवाच्या काळात सातत्याने वाजविली जात असलेली वाद्यवृंद, ढोल-ताशे, नाशिक ढोल याचा लहान मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. आपण उत्सव साजरे करताना प्रामुख्याने याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, ध्वनिप्रदूषणामुळे होणारे आजार हे आयुष्यभर जडतात. रहिवासी क्षेत्र जेथे मोठ्या संख्येने मानवी वस्ती आहे, अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने आवाजाची तीव्रता मोजली जाते. गेल्या वर्षी न्यायालयाने निर्देश दिल्याने मंडळांनी त्याचे पालन केले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे आवाज करणारे साऊंड सिस्टीम वापरात आणले नव्हते. यावेळीही मंडळांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ सरकार सांगते आहे, सेवाभावी संस्था सांगत आहेत म्हणून ‘आवाज’ कमी करू नये, तर आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही आणि सार्वजनिक उत्सव ध्वनिप्रदूषणविरहित साजरे होतील यासाठी कार्यरत राहावे.
(लेखिका आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत.)
महोत्सवासोबत आरोग्यही महत्त्वाचे
सार्वजनिक उत्सव साजरा करताना आरोग्याचा विचार करा. जसा उत्सव महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या पद्धतीने कानठाळ्या बसवीत असलेल्या ‘साऊंड सिस्टीम’वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली. त्याच पद्धतीने ‘मेटल ड्रम’च्या आवाजावर बंदी घालण्याची गरज आहे.
मानवी आरोग्य, जीवन महत्त्वाचे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी साधारण 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. मात्र, आवाजाच्या लहरी 112 डेसिबलपर्यंत गेल्याच्या नोंदी आहेत.
आवाजाची मर्यादा
रहिवासी क्षेत्रात
55 डेसिबल दिवसा
45 डेसिबल रात्री
व्यावसायिक क्षेत्रात
65 डेसिबल दिवसा
55 डेसिबल रात्री
(स्रोत - आवाज फाऊंडेशन)
(शब्दांकन - सचिन लुंगसे)