डॉ. किशोर पाठक
औरंगाबाद - बाप्पासाठी आपण आकर्षक सजावट, आरास करतो ती अर्थात पर्यावरणपूरक असायला हवी. महागडे साहित्य, नक्षत्रमाळा, प्रखर दिवे, गडद रंगांची उधळण या गोष्टींमुळेच गणपती उत्सव उठून दिसतो असे नाही.
घरगुती असो वा सार्वजनिक गणपतींसाठी आरास, सजावटीचे साहित्य हे निकृष्ट आणि प्लास्टिकपासून बनवलेले असते. याऐवजी रंगीत कागदांची नक्षीकाम असलेली झिरमिळी, पताका, सुतळी लावून सजावट करावी. गणपती बाप्पासमोर सजावट, आरास मांडताना वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांचा (पत्रींचा) वापर होतो. यामध्ये प्रामुख्याने मंदार, बेल, कन्हेर, अग्निशिखा, मुसळी, तुळस, अर्जुन, मधुमालती, आघाडा, शमी, डाळिंब, निरगुडी, पिंपळ, जाई, हदगा या पूजापत्रींचा समावेश असतो. पूर्वी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा तुटवडा नसायचा. परंतु आता आपण सभोवती परदेशी वनस्पती लावून ठेवतो आणि या पूजापत्री विकत आणतो. या पूजापत्री म्हणजे विविध वनस्पती वृक्षांची पाने हे विक्रेते ओरबाडून आणतात. एक तर या वनस्पतींची लागवड बगिचांमध्ये करावी आणि पूजापत्री म्हणून वापरावी किंवा त्याऐवजी फळांची आरास मांडावी.
कागदी फुले वापरावीत
श्रीगणेशाच्या मूर्तीच्या समोर कागदी फुले, खऱ्या फुलांच्या माळा वापराव्यात. आरास करताना दोन्ही बाजूंनी छोट्या कुंड्यांमध्ये रोपे किंवा फुलझाडांची आपण आरास मांडू शकतो. जरबेरा, ऑर्किड, निशिगंध, गुलाबाच्या काही प्रजाती, झेंडूंची फुले ८-८ दिवस चांगली टिकतात, टवटवीत राहतात. तसेच या महिन्यात विविध फुले सर्वत्र उपलब्ध असल्याने त्यांचे हार मूर्तीस घालावे. सध्या गणपती बाप्पाच्या सजावटीत मोरपिसांचा वापर वाढलेला आहे. तेही टाळायला हवे.
निसर्गाला शोभणारी आरास
पुठ्ठा, रंगीत कागद कापून त्याला विविध आकारात कापून नैसर्गिक रंग वापरून आकर्षक आरास करता येते. याशिवाय रंगीत नक्षीदार कापडांची सजावट कापडाची रिबीन, गोंडेसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. बाप्पाच्या मूर्तीसमोर करण्यात येणारी आरास ही निसर्गाला शोभणारी असावी.
थर्माकोलऐवजी जाडपुठ्ठासुद्धा वापरता येतो. प्लायवूडच्या बारीक काप्या काढून त्यावर रंगकाम करून / चित्रे चितारून पक्की आरास तयार करता येते. मूर्तीच्या मागे कापडी पडदे वापरून त्यावर चित्रे रंग देऊन उत्तम देखावे काढता येतात.
(लेखक सृष्टी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आहेत.)