महेंद्र दातरंगे
नाशिक - नैसर्गिक जलसाठे पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित टिकवून ठेवण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. पाण्याचे महत्त्व आपण लक्षात घेत धार्मिक सण-उत्सव काळातही त्याबाबत कृतिशील उपाययोजना करायला हव्यात. निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे.
गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण वाढलेले असते. दहा दिवस गणेशमूर्तीला वाहिलेली फुले, दूर्वा, फुलांचे हार, फळे, नैवेद्य आदी वस्तूंचा निर्माल्य स्वरूपातील साठा अनंतचतुर्दशीला नदीपात्रात सोडला जातो. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नैसर्गिक जलसाठ्यांची अपरिमित हानी होते. राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मूर्ती दान आणि निर्माल्य संकलनाची मोहीम साधारणत: १९९२ साली सुरू केली गेली. सर्वप्रथम कोल्हापूर आणि नंतर नाशिकला या विवेकाचा आवाज बुलंद झाला.
१९९५ साली नाशिकला निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यास सुरुवात ‘अंनिस’ने केली. गणेशोत्सवात जलप्रदूषण होते हे पटवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही लक्ष वेधले आणि न्यायालयातदेखील याविषयी दाद मागितली. काळानुरूप आज चित्र बदलले असून निर्माल्य, गणेशमूर्ती संकलनाचे काम आता अंनिसला करायची गरज भासत नाही. कारण विविध सामाजिक, समविचारी संघटना यासाठी सरसावल्या आहेत. निर्माल्य पाण्यात टाकल्यानंतर ते कुजून सडते. त्यामुळे पाण्यात आपोआप रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यातील जैवविविधता धोक्यात येते. हे टाळायला हवे.
मानसिकता बदला
पीओपीपासून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. लाखो किलो पीओपी नदीपात्रात सोडली जाते. ते जलसाठ्यात विरघळत नाही त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत व जलचर जैवविविधता संकटात सापडते. घातक रासायनिक द्रव्यांमुळे त्वचारोगापासून गंभीर व दुर्धर आजारदेखील ओढावण्याचा धोका असतो.
नदीचे वाहते पाणी पुढे शेतीला मिळाले तर जमिनी नापिकी होतात. शेती उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी मानसिकता बदलणे देखील गरजेचे आहे.
तरुणांनी पुढाकार घ्यावा
तरुणाईने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि नैसर्गिक जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण नद्यांना मनापासून पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची गरज आहे. वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित कराव्या या नियमात कालसापेक्ष बदल करणे गरजेचे आहे.
1997 साली केवळ १०२ नाशिककरांनी त्यांच्या विसर्जित मूर्ती समितीकडे दान केल्या. तेव्हापासून संपूर्ण राज्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
(लेखक महाराष्ट्र अंनिस नाशिक शाखेचे जिल्हा कार्यवाह आहेत.)
शब्दांकन : अझहर शेख