डॉ. माधवी रायते
सोलापूर - मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. या उत्सवामुळे जिवाभावाच्या भेटी व्हायच्या, एका अपूर्व प्रासादिक वातावरणात गणेशपूजा व्हायची, मने बांधली जायची. टिळकांच्या या महान संकल्पनेला रचनात्मक आणि विधायक स्वरूप देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. समाज प्रबोधनाचे हे शस्त्र संकट निवारणासाठी वापरायला हवे.
सामूहिक उत्सव साजरे करण्यासाठी आदर्श नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्वात प्रथम सार्वजनिक मंडळांकडून घेण्यात येणारी वर्गणी ही ऐच्छिक असायला हवी. शहरातील अनेक पेठांमधून अनेक गणेश मंडळे स्थापन करण्यापेक्षा ‘एक पेठ, एक गणपती’, ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अमलात आणायला हवी. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक बनवाव्यात. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या अथवा शाडूच्या छोट्या मूर्ती विक्रीसाठी ठेवायला हव्यात. या मूर्तीमध्ये ‘सीड बॉल’ ठेवावेत. विसर्जनाच्या ठिकाणी पाण्यात उपयुक्त वनस्पतींची वाढ होऊ शकते. यासाठी मूर्तीमध्ये चिंचोके, सीताफळांच्या बिया, आंब्याच्या कोई, कडुनिंबाच्या निंबोळ्या, जांभळाच्या बिया ठेवाव्यात. मातीची मूर्ती तलावात किंवा इतर ठिकाणी विसर्जित केल्यानंतर त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदा होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुबुद्धी देवो हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.
चित्रप्रदर्शन, पोस्टर
गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश प्रबोधन आणि जनसंघटन असल्याने प्रबोधनपर पोस्टर, चित्रप्रदर्शन यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करता येऊ शकते. लहान-लहान उपक्रमातून हा उत्सव आपण पर्यावरणपूरक करूशकतो. यासाठी प्रत्येकाने संकटमोचक गणपती होऊनच हा भगीरथाचा रथ ओढायचा आहे.
डीजे नकोच!
10 नंतर रात्री ध्वनिवर्धक बंद ठेवायला हवे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल उधळू नये. ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डीजेच्या वापरावर बंदी असायला हवी.
शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रमाजवळ गणेशमूर्तीची स्थापना करू नये. निर्माल्य शक्यतो छोट्या खड्ड्यांमध्ये विसर्जित करावे. या खड्ड्यांवर माती टाकावी. याचा वापर पुढे सेंद्रिय खत म्हणून करता येऊ शकतो.
(लेखिका कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठाता आहेत.)