- सायली दिवाकर
“अरे चिन्मय! निवांत टी.व्ही. काय पहात बसलायस? परीक्षा सुरु आहे ना तुझी? उद्या कोणता पेपर आहे? चल उठ बघू, आधी अभ्यासाला बस. टी.व्ही. बंद म्हणजे बंद.”
“अग आई.. उद्या एन्व्हायर्नमेंटल सायन्सचा पेपर आहे. त्यात काय अभ्यास करायचा, सारखं तेच तेच तर असत त्यात, ‘Save Water, Save Earth, Save Tree’. मला माहित आहे सगळं!”
“बर बर, EVS चा पेपर आहे होय, मग ठीक आहे. पण टी.व्ही. बघत बघत उद्याचे दप्तर लावून घे. डबा, वॉटर बॅग काढलीस का बघ.”
“हो ग आई, आवरतो.”
टी.व्ही.वर अॅड लागल्यावर मग चिन्मय बॅगेतील डबा काढतो व डब्यातील उरलेली भाजी-पोळी सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो व वॉटरबॉटल मधले उरलेले पाणी बेसिन मध्ये ओततो आणि घाईघाईने कार्टून सुरु होण्याआधी टी.व्ही.समोर जाऊन बसतो. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे काहीही विचार न करता डब्यातील भाजी-पोळी कचऱ्याच्या डब्यात फेकणाऱ्या व वॉटरबॉटल मधले उरलेले पाणी बेसिन मध्ये ओतणाऱ्या चिन्मयला, परीक्षेत मात्र A+ शेरा मिळालेला असतो. हेच का ते आपले पर्यावरणशास्त्राचेशिक्षण? म्हणजे शाळेत पर्यावरणाची व्याख्या, त्याची व्याप्ती, त्याचे स्वरूप, जनजागृती, व्यवस्थापन असे जडजड शब्द वापरून पर्यावरणशास्त्राचा अभ्यासक्रम तयार करायचा व सर्व शालेय, महाविद्यालयीन व विद्यापिठीय स्तरावर तो राबवायचा. पर्यावरण संवर्धनासाठी विविध शासकीय योजना घोषित करायच्या, त्या राबवण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमायच्या.. बस.. संपल..! त्यानंतर म्हणायचं की, “आम्ही पर्यावरण रक्षणाबाबत अतिशय दक्ष आहोत.” मग सध्या जी जागतिक तापमानवाढ झालीय, ओझोन वायूचा स्तर कमी झालाय, महापूर येतोय, आम्लपर्जन्य बरसतोय.. हे सर्व काय आहे? भारतासारख्या देशांमध्ये जिकडे-तिकडे जल, भू, वायू, सागर, ध्वनी तसेच औष्णिक प्रदुषणाचा विळखा बसलाय, ते सर्व काय आहे?
मानवाने आपली उत्क्रांती करून विज्ञान आणि तंत्रज्ञानात अगदी प्रचंड प्रगती केली असली तरी अतिसुखाच्या हव्यासापोटी स्वत:चेच आरोग्य धोक्यात घातले आहे. मग लहान वयातच येणारे हार्टअटॅक, डायबेटीस, ब्लडप्रेशर, किडनीचे रोग, कॅन्सर अशा अनेक जीवघेण्या व्याधींनी मनुष्याचे जगणे मुश्किल केले आहे. आज मनुष्याची सुखी जीवनाची व्याख्या काय आहे माहितीय का? मोठ्या शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ऐसपैस घर, गाड्या, सततच्या शॉपिंगसाठी मोठे मॉल्स, हॉटेल्स.. बास.. माणसाला वाटत, आपलं आयुष्य एकदम ‘सेट है भाई!’ पण अचानक शहरात महापूर येतो आणि होत्याच नव्हत करून जातो. अशावेळी जीव मुठीत धरून सैरावैरा धावत प्राण वाचवण्यासाठी आपण जीवाच्या आकांताने टाहो फोडतो. मग त्यावेळी नाही उपयोगी पडत आपला बँक-बॅलन्स, गाडी किंवा बंगला. आपण ते सर्व अक्षरश: तिथेच टाकून प्रथम आपला जीव वाचवतो.
आज एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच मानवाने आपल्या असीम बुद्धीच्या जोरावर प्रगतीची अनेक शिखरे गाठली. प्रगतीचा उच्चांक गाठणारी भारताची आताची कामगिरी म्हणजेच चांद्रयान-२. पण मानवाने कोणत्याही क्षेत्रात कितीही उच्च कोटीची प्रगती केली, तो अंतराळात गेला, एखाद्या ग्रहावर गेला, तरी तिथे तो जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी व अन्न ह्या तीनच गोष्ठी शोधेल आणि त्या जर नाही मिळाल्या तर पृथ्वी सोडून अन्यत्र कुठेही मानवी जीवन विकसित होऊ शकणार नाही. याचाच अर्थ आत्ताच्या घडीला तरी मनुष्यजातीसाठी ‘पृथ्वी’ हाच ग्रह सर्वात महत्त्वपूर्ण आहे हे नक्की आणि हा निष्कर्ष काढायला कोणत्याही तज्ञाची गरज नाही, हो ना?
एखादा मानव पृथ्वीतलावर जन्माला येतो त्या क्षणापासून तो इथला प्राणवायू शरीरात घेतो व कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो. तोच कार्बन डायऑक्साईड वायू वनस्पती वापरतात आणि सूर्यप्रकाशाच्या साह्याने आपले अन्न तयार करतात’ शिवाय ह्या प्रक्रियेतून पुन्हा प्राणवायूची निर्मिती करतात. ह्या वनस्पतींपासूनच मानव आपल्या अन्नाची निर्मिती करतो. माणसाच्या शरीर रचनेचा विचार केल्यास शरीराच्या एकूण वजनापैकी ६५% वजन शरीरातील पाण्याचे असते. तसेच शरीरात जे रक्त वाहते त्यामध्ये देखिल ८३% पाणीच असते. मग असे लक्षात येते की, हवा-पाणी-वनस्पती ह्या पर्यावरणीय घटकांशिवाय आपले अस्तित्व कदापिही शक्य नाही.
म्हणूनच पर्यावरणशास्त्र हे आपल्या ‘मानवाच्या अस्तित्वाचे’ शास्त्र आहे. याचे गांभिर्य लक्षात घेऊनच शासनाने सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण सक्तीचे केले. पण याची फलश्रुती काय तर चिन्मयसारख्या मुलांना कमी अभ्यास करून भरपूर मार्क्स देणारा विषय, इतपतच त्याचे महत्त्व! एकूणच विचार केल्यावर असे दिसून येते की उच्चशिक्षणासाठी पर्यावरणशास्त्र हा विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे आणि मग समाजातील प्रत्येक वर्ग पर्यावरणाचा समतोल ढळतोय म्हणून ओरडत असतो.
पर्यावरणाचा समतोल ढळू नये म्हणून खरोखरच काही करायचे असेल तर मुलांना पर्यावरणाचे शिक्षण हे पाठ्यपुस्तकातून न देता प्रात्यक्षिकांतून द्यावे. हल्लीच्या काळात मुल २ ते २½W वर्षापासून शाळेत जाऊ लागते आणि मुलांचे हात, बोटे पुरेशी सक्षम होण्याआधीच त्यांना पेन्सिल, पेन देऊन इंग्लिश-मराठी अक्षरे गिरवत बसवले जाते. त्यापेक्षा २ ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांना ह्या जगाची ओळख करून द्या, ही सृष्टी म्हणजे काय आहे? ही पानं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, झरे अशा नैसर्गिक घटकांची ओळख करून द्या. त्यांना ह्या गोष्ठी प्रत्यक्षात आवर्जून दाखवा.
इ. १ली ते ४थी पर्यंतच्या मुलांना हे जग, ही पृथ्वी, ग्रह, तारे, सूर्य, वनस्पती, जंगल, खडक, डोंगर, समुद्र ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊद्यात. आपण जे पाणी नळातून पितो ते सुंदर अशा डोंगर-दऱ्यातून वाहात नदीत कसे जाते, ती नदी मग समुद्राला कशी मिळते हे प्रत्यक्ष अनुभवू द्या. मग ह्या मुलांना पाणी वाचवा हे पाठ्यपुस्तकातून शिकवावे लागणार नाही. ह्या लहान मुलांना पृथ्वीवर विविध प्रकारचे किती सूक्ष्मजीव आहेत हे दाखवा, त्यासाठी त्यांना डोंगर-दऱ्या, जंगले पालथे घालू द्यात. त्यांना झाडांमधून हिंडू द्या, सुंदर फुलपाखरे, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी पाहू द्या. आपण रोज खातो ते धान्य कसे उगवते ते अनुभव करून त्यांना पाहू द्या, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांना स्पर्श करू द्या.
इ. ५वी ते ७वी पर्यंतच्या मुलांना आपण जेथे प्रत्यक्ष घेऊन जाऊ शकत नाही अशा ठिकाणांची माहिती, आपली सागर संपत्ती, जल संपत्ती, खनिज संपत्ती, वन संपत्ती, यांसारख्या अमुल्य खजिन्याची ओळख प्रोजेक्टरद्वारे देऊ शकतो. त्यांचे महत्त्व, त्यांचा उपयोग, त्यांचे संवर्धन ही नंतरची गोष्ट आहे. या मुलांना आधी भान येऊ दे की, अरे! ही सृष्टी किती अनोख्या, अदभूत गोष्टींनी संपन्न आहे, आणि मुलांना हे समजून घेऊ दे की ह्या पर्यावरणीय संपत्तीचा खजिना समस्त सजीव सृष्टीला बहाल केलेला आहे. अशी किती तरी माहिती आपण या वयोगटातील मुलांना देऊ शकतो, त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करू शकतो.
यानंतरचा वयोगट म्हणजे, इ. ७वी नंतरच्या मुलांना भूकंप, महापूर, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीची माहिती देऊन, अशा आपत्तीच्या वेळी काय काळजी घ्यावी याचे ज्ञान मुलांना देणे गरजेचे आहे. आम्लपर्जन्य तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण हे मुलांना प्रत्यक्ष दाखवले पाहिजे. मग हे सर्व होऊ नये यासाठी खबरदारी कशी घ्यायची हे शिकवावे. शाळेत अनेक छोटे प्रायोगिक उपक्रम राबवावेत.
उदा.-
- आपला वर्ग स्वत: स्वच्छ ठेवायला शिकवा
- आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर द्या
- वर्गात किंवा शाळेच्या परिसरात प्लास्टिक वापरावर बंदी घालावी
- प्रत्येक मुलास आठवड्यातून एकदा शाळेतील बागेत काम करण्याची संधी द्यावी
- महिन्यातून एकदा पेन-पेन्सिल-वह्या-पुस्तकांविना शाळा भरवून त्यांना निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचा जवळून पाहण्याचा आनंद घेऊ द्या, निसर्गात मोकळेपणाने वावरण्याची संधी द्या
अशा प्रकारे मुल शाळेत जाऊ लागल्यापासून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत नैसर्गिक साधनसंपत्तीची ओळख (माहिती नव्हे) त्यांना होईल. ह्या सर्वांचे प्रचंड ज्ञान मिळाल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या अंगी जागरूकता येईल. मग ह्या मुलांना पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा हे पाठ्यपुस्तकातून शिकवावे लागणार नाही. उलट ह्या सृष्टीवरील इतका मोठा खजिना मुलांना माहित झाल्यामुळे ह्यातील अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याचे आकर्षण त्यांना वाटेल. कारण मुलांनापण गूढ, अनाकलनीय व नवीन ज्ञान घ्यायला आवडते. नाहीतरी आत्ताच्या रटाळ, कंटाळवाण्या अभ्यासक्रमात मुले मुळीच रमलेली दिसत नाहीत. तिथेही ‘घोका व ओका’ हीच प्रवृत्ती दिसून येते. ह्या पद्धतीमध्ये डोक्यातच काही शिरत नाही त्यामुळे आचरणात येणे हे अशक्य असते. त्यामुळेच चिन्मय सारखी अनेक मुले एकीकडे ‘Save Water, Save Earth’ हे पाठ करून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवतात व प्रत्यक्ष कृतीत बॉटलमध्ये शिल्लक राहिलेले पाणी बेसीन मध्ये ओततात. म्हणून हा विरोधाभास दूर करण्यासाठी ‘कृतीयुक्त शिक्षणाची गरज आहे.’
निदान पर्यावरणशास्त्र हा विषय शिकवण्यासाठी तरी ‘घोका व ओका’ ह्या पाठ्यपुस्तकीय ज्ञानाचा काही उपयोग नाही, तर प्रत्यक्ष झाड लाऊन, कृती करून शिकवण्याचे हे शास्त्र आहे. शेवटी चांद्रयान-२ काय आणि जगातील इतर कोणतेही यान काय, अंतराळात कुठेही पाठवल तरी शोधणार काय तर – ‘हवा-पाणी-वनस्पती’. जगातला कितीही श्रीमंत, धनाढ्य व्यक्ति काय किंवा झोपडीत राहणारा अति गरीब व्यक्ति काय दोघांच्याही गरजा हवा-पाणी आणि अन्न. कितीही श्रीमंत असला तरी जेवताना तो डॉलर, हिरे-मोती, सोनं नाही खाऊ शकत. म्हणजेच मानवाला पर्यावरणाच, त्यातील प्रत्येक घटकाच महत्त्व आहे, त्याची जाणिव आहे.
मग ह्या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करा, जतन करा, सांभाळ करा हे सर्व सांगायला शासनाच्या योजनांची गरज का भासते? प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य, सोसायटी, संस्था, समाज ह्या सर्वांनी ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ह्या सर्व घटकांनीच तर समाज बनतो ना? मग प्रत्येक कुटुंबाने, घरातील आई-वडिलांनी आपल्या मुलांवर ह्या सर्व गोष्टींचे संस्कार का करू नये? घरातला पैसा-अडका, सोन-नाण, मालमत्तेची कागद-पत्र, गाड्या ही भौतिक संपत्ती सांभाळायचे संस्कार कुटुंब करतच ना? मग तुमचं मुल जो श्वास घेतं, जे पाणी पित ती हवा शुद्ध ठेवायचे, जलाशय स्वच्छ ठेवायचे व ज्या वनस्पतीचे तो अन्न खातो त्या वनस्पतींचे संवर्धन करण्याचे संस्कार का नाही घरातून केले जात?
विचार करा, खूप सोपं आहे, अवघड काहीच नसत. ठरवलं की सगळं शक्य होत. प्रत्येक घरातील कुटुंबाने, प्रत्येक शिक्षण संस्थांनी, कारखान्यातील लोक, सर्व ऑफिसेस, व्यापारी अशा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी ठरवले तर नक्कीच क्रांती येईल. अरे एक अब्जाहून अधिक जनता आहे या देशाची. ठरवलं तर संपूर्ण भारतातीलच प्रदूषण काही दिवसात आपण नाहीसे करू शकू! मग पहा, भारतातला प्रत्येक नागरिक शुद्ध व मोकळा श्वास घेऊ शकेल.
तर मग विचार करा, ठरवा आणि पर्यावरणासाठी तुमचे एक पाऊल पुढे टाका.