निशांत वानखेडेनागपूर : भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र, आता एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच अनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. भारतासह काही देशांतील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.
‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॅल्युशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत प्रकाशित एका शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशांतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष त्यात मांडले आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला.
पाटील यांच्या मते, केवळ वाघच नव्हे, तर इतरही वन्यप्राण्यांचे संचार मार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली. मात्र, वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढणे यामुळे वाघांचे एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत.
माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता असते. - डाॅ. हेमंत जैन, व्हेटरनरी सर्जन
काय हाेतात दुष्परिणाम
- आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.
- कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.
- कालांतराने सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजाती नाहीशा हाेण्याचीही शक्यता.