अजय पाटील जळगाव : जैव विविधतेने समृध्द सातपुडा पर्वत रांगेत अत्यंत दुर्मीळ असलेल्या ‘मोठी पान लवंग’ (लुडविगीया पेरुवियाना) या वनस्पतीची नोंद झाली आहे. जळगावच्या इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. तन्वीर खान यांनी या वनस्पतीची नोंद केली आहे. या दुर्मीळ वनस्पतीची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सातपुड्यातच ‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीची नोंद केली होती.
‘मोठी पान लवंग’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लुडविगीया पेरुवियाना असे आहे. जगात या वनस्पतीच्या ८२ तर भारतामध्ये ७ प्रजाती आढळतात. या वनस्पतीला पिवळ्या रंगाचे मोठे फुल असते. याची पाने लंबवर्तुळाकृती तर उंची साधारणपणे २ ते ३ मीटर इतकी असते. नदीकाठच्या आर्द्रयुक्त दलदलीच्या जागेवर ही वनस्पती आढळून येते.
१९५७ मध्ये भारतात पहिल्यांदाच नोंदया वनस्पतीची भारतात सर्वप्रथम नोंद १९५७ मध्ये चैन्नईमध्ये डॉ. फिचर यांनी केली. त्यानंतर डॉ. नायर यांनी १९७८ मध्ये केरळ व डॉ. बरवा यांनी १९९३ मध्ये आसाम या ठिकाणी या वनस्पतीची नोंद केली होती. डॉ. तन्वीर खान यांनी सातपुड्यातील दलदलयुक्त भागात या वनस्पतीची नोंद केली आहे. डॉ.खान यांनी तयार केलेला शोधनिंबध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविला असून, तो लवकरच प्रसिध्द होणार आहे.सातपुडा भागात स्वदेशी व विदेशी पक्ष्यांप्रमाणे वनस्पती देखील आढळून येतात. सातपुड्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींचा ºहास होणार नाही याची शासन व वनविभागाने खबरदारी घ्यायला हवी. राज्यात पहिल्यांदाच या वनस्पतीची नोंद झाली आहे. -डॉ. तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक, जळगाव.