शीतलकुमार कांबळे
सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे. या अभयारण्यात माळढोक दिसत नसल्यामुळे सोलापूरची ही ओळख विस्मरणात जाण्याची शक्यता आहे.
माळढोक हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश व मध्यप्रदेश या राज्यांतील काही भागांत आढळतो. संबंधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्ये माळढोक अभयारण्याची घोषणा केली. या अभयारण्यात सोलापूर जिल्ह्याचे उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्याचे काही क्षेत्र व अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत, श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील काही क्षेत्राचा समावेश आहे. माळढोक पक्ष्याचा समावेश वन्यजीव कायदा १९७२ च्या शेड्युल- १ मध्ये करण्यात आला आहे.
अभयारण्याचे मुख्यालय सोलापूर जिल्ह्यासाठी नान्नज येथे व अहमदनगर जिल्ह्यासाठी रेहेकुरी येथे आहे. लहान-मोठी शहरे, शेकडो खेडी, रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे, शेतीचे हजारो हेक्टर क्षेत्र, लहान औद्योगिक वसाहती, असे क्षेत्र अभयारण्याखाली आल्याने सुरुवातीपासूनच या अभयारण्याला विरोध होत होता. स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या संख्येत असलेले माळढोक ब्रिटिश आणि स्थानिक शिकाऱ्यांचे बळी होत गेले. मोठी वाहने वापरून माळरानावर फिरून या पक्ष्यांची शिकार होऊ लागली आणि माळढोकची संख्या हळूहळू कमी होत गेली. माळढोक वर्षातून एकदा एकच अंडे देतो, तेही उघड्यावरच (जमिनीवरच, झाडांच्या बुंध्यांच्या आसपास, नांगरटीमध्ये). त्यामुळे शिकारी पक्षी, भटकी कुत्री, घोरपड हे प्राणी माळढोकचे अंडे खातात.
म्हणे, अभयारण्य कशाला?
अभयारण्यात माळढोक दिसला नाही तर अभयारण्य कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माळढोक या परिसरात दिसत नसला तरी तो येणारच नाही अशी परिस्थिती नाही, तसेच अभयारण्याला नाव माळढोकचे असले तरी येथे कोल्हा, लांडगा, काळवीट, घोरपड आणि इतर प्राणी व पक्षी आहेत, त्यामुळे अभयारण्य नको असे म्हणणे उचित होणार नाही. येथील जमिनीसाठी काही लोक अपप्रचार करीत असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे गवतही वाढले आहे. माळढोक पक्षी यावा आणि राहावा यासाठी शासन व पक्षीमित्रांकडून अभयारण्यात काही सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचीही याला चांगली साथ मिळत आहे. अभयारण्यातील काही घडामोडींमुळे तो विचलित झाल्याचे सध्या दिसत नाही. मात्र, त्याला अंडी घालण्यासाठी पोषक वातावरण असल्याने तो पुन्हा येथे येईल.
- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक