नागपूर : राज्यात जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये सांडपाणी समस्या असताना नागपूर महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून वर्षाला १५ कोटी रुपये कमावीत आहे. दोन महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२० पर्यंत हे उत्पन्न ३३ कोटींवर जाणार आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखांच्या घरात आहे. शहरातील घराघरातून जवळपास ६५० एमएलडी सांडपाणी निघते. हे सांडपाणी पूर्वी नाग नदीद्वारे वाहून जात वैनगंगा नदीत सोडले जात असे. यामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून होणाऱ्या प्रदूषणासह वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये भूगर्भातील पाणी दूषित होण्याचा धोका वाढला होता. ही समस्या सोडविण्यासाठी नागपूर महापालिकेने महाजेनको, तसेच खासगी आॅपरेटर यांच्याशी त्रिपक्षीय करार केला. यानुसार शहरातून निघणाऱ्या ६५० एमएलडी सांडपाण्यापैकी ३३० एमएलडी पाण्यावर भांडेवाडी येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. यातील १३० एमएलडी पाणी २०१७ पासून कोराडी वीज केंद्राला पुरवठा केले जात आहे. यातून मनपाला वर्षाकाठी १५ कोटींचे उत्पन्न होत आहे. ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची. उर्वरित २०० एमएलडी सांडपाणी जानेवारी २०२० पासून खापरखेडा केंद्राला पाठविले जाणार आहे. या प्रकल्पाला एकूण १२५ कोटी खर्च आला आहे. हा खर्च केंद्र शासनाकडून ५० टक्के , राज्य शासनाकडून ३० टक्के व महापालिकेद्वारे २० टक्के. या प्रकल्पाच्या विस्ताराचे काम सुरू असून, त्याला ११० कोटींचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. या माध्यमातून मनपाचे उत्पन्न ३३ कोटींवर जाणार आहे. याशिवाय आणखी ३५० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिका सुरू करणार असून, यातून मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पाला पुरवठा करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेतून मनपाच्या तिजोरीत ४० ते ४५ कोटींचा महसूल जमा होणार आहे.
कोराडी, खापरखेडा व मौदा येथील वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनावरही परिणाम होतो; परंतु आता वाया जाणारे सांडपाणी प्रक्रिया करून प्रकल्पासाठी वापरण्यात येत असल्याने पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचीही बचत होत आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पातून वीज प्रकल्पांनाही पाणीपुरवठा केला जायचा. सांडपाण्याच्या पुनर्वापरामुळे यातही बचत होत आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता प्रतिव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे नागपूरकरांना दररोज ५५० ते ६०० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, शहराला ७०० ते ७२५ एलएलडी पाणी दररोज पुरविले जात आहे. वीज प्रकल्पाला जाणाऱ्या पाण्याच्या बचतीमुळेच हे शक्य झाले आहे.
320 एमएलडी पाण्यामुळे प्रदूषणप्रक्रिया न केलेले ३२० एमएलडी पाणी सध्या नाग नदीत सोडले जाते व त्यानंतर ते वैनगंगा नदीत जाते. यामुळेच अंभोरा तीर्थक्षेत्राचा परिसर प्रदूषित झाला आहे. वैनगंगेसह कन्हान, मुरझा, आमनदी व कोलारी या पाच नद्यांचा येथे संगम आहे. त्यामुळे पिंडदानाच्या कार्यासह पर्यटनाचेही महत्त्व आहे. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अंभोरासह आसपासच्या २०-२५ गावांना या प्रदूषणाचा फटका बसल्याच्या तक्रारी आहेत.
शहरातील दोन्ही प्रक्रिया केंद्रे भांडेवाडीला आहेत. नागपूरला आता वेगवेगळ्या ठिकाणी छोटे-छोटे प्रकल्प करण्याची गरज आहे. कारण या प्रकल्पांना जेवढा खर्च येणार आहे, तेवढाच खर्च सांडपाणी शहराबाहेर प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी येत आहे. - कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ, नागपूर