कोल्हापूर : परताळा परिसरातून रंकाळा तलावात मिसळणारे दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी रोखण्यात शनिवारी महानगरपालिका ड्रेनेज विभागाला यश आले. जेथून हे सांडपाणी मिसळत होते, त्या ती नळ्यात मातीची पोती टाकून सांडपाणी अडविले. शिवाय अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या पाणीच्या प्रवाहातील अडथळेही दूर करण्यात आले.गुरुवारी रात्रीपासून अचानक परताळ्यातील काळेकुट्ट सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत होते. ज्या बाजूने सांडपाणी मिसळत होते, तेथे पूर्वी मातीची पोती टाकून बंधारा तयार करुन नळ्यातून तलावात जाणारे पाणी रोखले होते. पण गुरुवारी रात्रीनंतर अचानक नळे त्यातून रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू लागले होते. ही बाब महापालिका आरोग्य विभागाच्या लक्षात येताच तातडीने प्रयत्न करुन पुन्हा एकदा नळे मुजवून सांडपाणी रोखले गेले.पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, ड्रेनेज विभागाचे प्रमुख शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी दुपारनंतर मातीची पोती आणून टाकण्यास सुरवात केली होती. शनिवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. सांडपाणी मिसळणे बंद झाले. त्याच वेळी परताळ्यातील सांडपाणी महात्मा फुले सोसायटीच्या बाजूने साडेचारशे एमएम जाडीची पाईप लाईन टाकण्यात आली असून चेंबरही बांधली आहेत. ही चेंबर साफ करुन सांडपाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर केले.