कोल्हापूर : पंचगंगा नदीत मिसिसिपी प्रांतात आढळणारा ॲलिगेटर गर जातीचा जैवविविधतेला धोका असणारा मासा आढळला असून नदीतील स्थानिक माशांचा फडशा पाडत असल्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. जैवविविधता विभागाने याचे सर्वेक्षण न केल्यास मासे संपण्याची भीती वन्यजीव तज्ञांनी व्यक्त केली आहे.कोल्हापूरमधील प्रयाग चिखली येथे किशोर जगन्नाथ दळवी आणि रघुनाथ दळवी यांना पंचगंगा नदीत मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात हा मासा लागला आहे. या माशाचे तोंड सुसरीच्या तोंडासारखे दिसते. पहिल्यांदाच पंचगंगा नदीत या प्रकारचा मासा सापडला असला तरी गेल्या काही वर्षापासून त्याचे वास्तव्य या नदीत असण्याची शक्यता असून नदीतील स्थानिक मासे हे त्याचे खाद्य आहे. यामुळे नदीतील मूळ स्थानिक माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत.
यापूर्वी मुंबई, पुण्यातील पवना नदीत, साताऱ्यात फलटणजवळील नीरा नदीत हा मासा आढळला असून मूळ सदर्न युनायटेड स्टेटसच्या मिसिसीपी नदीत याचे वास्तव्य आहे. महाराष्ट्राशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, भुवनेश्वर, तामिळनाडू (कोचीन) या परिसरातही हा मासा आढळला आहे. भारतात याचे अस्तित्व आढळल्याने या माशाचे निर्मूलन करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याकडील स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज आहे.-डॉ. अमित सय्यद,वन्यजीव अभ्यासक, सातारा.